राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली असून अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.

हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आयएमडीतर्फे पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

१३ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ११ जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जूनमधील पावसाची तूट भरून एकूण मान्सूनच्या ४० दिवसांत ३४ टक्के जास्त पाऊस पडण्याचा विक्रम झाला. पावसाच्या पुनरागमनाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

दुष्काळी मराठवाड्यातही समाधानकारक पावसाची शक्यता असून मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.