तब्बल ५०० एकरवर कोथिंबीरचे उत्पादन, ९० दिवसात लाखांची कमाई

Coriander-farming

कोथिंबीरची शेती

शेत शिवार । नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूरच्या असंख्य शेतकर्‍यांनी एकत्र येत धन्याच्या उत्पादनासाठी तब्बल पाचशे एकरवर कोथिंबिरीची लागवड केली आहे.  हा प्रयोग शेतकर्‍यांना एकरी ५० हजार रुपयांचा नफा मिळवून देत आहे.

कमी खर्च कमी कष्टात आणि अगदी सहज उत्पन्न होणारे पीक म्हणून कोथिंबीरीच्या पिकांची ओळख आहे. बहुतांश शेतकरी घरी खाण्यासाठी गव्हू किंवा हरभरा पिकात धन्याची एखादी ओळ पेरत असतात. त्यातून घरच्या कोथिंबीरीसह धन्याची गरज भागते. तर भाजीपाला पिकवणारे शेतकरी देखील आंतरपीक म्हणून धने लागवड करतात, त्यातून आलेल्या हिरव्या कोथिंबीरीची बाजारात नेऊन विक्री करतात. मात्र या सगळ्या प्रकारापेक्षा शहापूर इथल्या शेतकर्‍यांनी मुख्य पीक म्हणून थेट कोथिंबीरीची लागवड केलीय.

एका एकर शेतीत पन्नास हजार रुपयांचा नफा मिळवून देणारे पीक म्हणून कोथिंबीरीची ओळख आहे. अवघ्या ९० दिवसांत येणार्‍या कोथिंबीरीतून एकरी दहा क्विंटल धन्याचे उत्पादन होते. साधारणतः सात हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव धन्याला मिळतो. एरव्ही आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून धण्याची लागवड होत असते मात्र शहापुरच्या या शेतकर्‍यांनी मुख्य पीक म्हणून धने लागवड केलीय. त्यामुळे पीक पद्धतीत होणार्‍या बदलातून जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत मिळणार आहे.

Exit mobile version