Cyclone Jovad : ओमायक्रॉनसोबतच आता ‘जोवाड’ चक्रीवादळाचे संकट

Jovad Cyclone

शेतशिवार । पुणे : देशावर सध्या ओमायक्रॉनचे (Omicron) संकट असतांना सोबत ‘जोवाड’ (Cyclone Jovad) चक्रीवादळ देखील बंगालच्या उपसागरावर धडकले आहे. हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि उडीशाच्या किनारपट्टी भागात धडकून पश्चिम बंगालच्या दिशेने जाणार आहे. प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

देशावर एकामागे एक नैसर्गिक संकट येत आहेत. या चक्रीवादळाला प्रशासनाने फार गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पंतप्रधानांकडून जोवाड चक्रीवादळासंदर्भात काल आढावा बैठक घेण्यात आली आहे. ३ पासून ५ डिसेंबरदरम्यान आंध्र प्रदेश, उडीशा आणि पश्चिम बंगालला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांसह इतर कोणीही समुद्रात न जाण्याचा इशारा आहे.

जोवाड चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्रतील श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, उडीशातील गजापती, गंजाम, पुरी, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंहपूर, केंद्रपारा जिल्ह्यांना बसण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, उडीशा, पश्चिम बंगालसोबतच आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरात देखील यामुळे मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्राला जोवाड चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही.

सौदी अरेबियाच्या सूचनेवरून या वादळाला ‘जवाद’ असं नाव देण्यात आले आहे. जवाद हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘उदार’ असा होतो. यापूर्वी आलेल्या चक्रीवादळांच्या तुलनेत या चक्रीवादळामुळे फारसा विध्वंस होणार नाही आणि सामान्य जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं सांगण्यात येत आहे.

Exit mobile version