जून महिन्यात पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांची पसंती व प्राधान्य बदलले; वाचा सविस्तर

rain 1

पुणे : यंदा जून महिन्यान पावसाने ओढ दिली होती. पावसाचे आगमन लांबल्याने पेरण्यांचाही खोळंबा झाला. याचा परिणाम म्हणून यंदा तृणधान्य व कडधान्यांचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र तेलबियांच्या पेरणीत वाढ झाली आहे. कडधान्यांची पेरणी टाळून शेतकरी सोयाबीन आणि कापसाच्या पेरणीवर भर देताना दिसत आहेत.

राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैअखेर राज्यात सरासरी ७० टक्के पेरणी झाली आहे. तृणधान्यांचा विचार करता कोकण, सह्याद्री घाटाच्या पट्ट्यात उशिराने पाऊस सक्रिय झाल्याचा परिणाम म्हणून भात लागण केवळ टक्क्यांवरच झाली आहे. मात्र, संपूर्ण जुलै आणि ऑगस्ट मध्यापर्यंत भाताची लागण होते, त्यामुळे भाताचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. त्याखालोखाल खरीप ज्वारी १८ टक्के, बाजरी ३५ टक्के, रागी केवळ ७ टक्के, मक्या ६४ टक्के पेरणी झाली आहे. राजगिरा, कोद्रा, कुटकी, राळा, वरई, सावा या तृणधान्यांची पेरणी केवळ २१ टक्केच झाली आहे. मागील वर्षांपेक्षा हे क्षेत्र ३३ टक्क्यांनी कमीच आहे.

कडधान्यांचा पेरा ५७ टक्के क्षेत्रावर झाला असला तरी त्यात सोयाबीन, तुरीचाच वाटा जास्त आहे. जूननंतर कडधान्यांची पेरणी फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे शेतकरी मूग, मटकी, चवळी, राजमा आदी पिकांची पेरणी टाळून तूर आणि उडदाची पेरणी करताना दिसत आहेत. तुरीची पेरणी ६६ टक्क्यांवर, मुगाची ४२ टक्क्यांवर, उडीद ५५ टक्क्यांवर, तर कुळीथ, चवळी, मटकी, राजमा आदींची पेरणी फक्त २६ टक्क्यांवर गेली आहे. उशिरा पाऊस आल्यामुळे यापुढे फक्त तूर, मूग, उडदाच्या क्षेत्रात वाढीची शक्यता आहे.

तेलबियांच्या पेरणीत वाढ झाली आहे. तेलबियांची पेरणी सुमारे ९० टक्के झाली आहे. त्यात सोयाबीन सर्वाधिक म्हणजे ९४ टक्के, भुईमूग ४४ टक्के, सूर्यफूल २९ टक्के, तीळ १३ टक्के, कारळं ९ टक्के आणि एरंडीसह अन्य तेलबियांची पेरणी फक्त १४ टक्क्यांवर गेली आहे. तर कापसाची पेरणी ८६ टक्क्यांवर झाली आहे.

विभागनिहाय पेरण्या
अमरावती, औरंगाबाद विभाग आघाडीवर खरिपाच्या पेरणीत अमरावती, औरंगाबाद विभाग आघाडीवर आहे. अमरावती विभागात ८४, तर औरंगाबाद विभागात ८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. नागपूर विभागात ५१ टक्के, लातूर विभागात ७४ टक्के, कोल्हापूर विभागात ५२ टक्के, नाशिक विभागात ६७ टक्के, पुणे विभागात ४९ टक्के आणि सर्वात कमी कोकण विभागात २४ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Exit mobile version