शेतकर्‍यांपुढे नवे संकट; ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत या भागांमध्ये पावसाची शक्यता

weather-alert-rain

नवी दिल्ली : चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वारे वाहत आहेत, त्यामुळे आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांसह कपाशीला फटका बसण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाचे केंद्र बनलं आहे. पावसामुळे रब्बी पेरणीच्या सुरुवातीच्या राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, तर भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.

यामुळे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि जोरदार वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Exit mobile version