खंड शेतीची यशोगाथा : ७ एकरवाल्याने केली १८० एकर शेती

- Advertisement -
दानापूर (ता.तेल्हारा, जि.अकोला) येथे गोपाल येऊन यांच्या कुटुंबाने दोन भावांच्या मदतीने १८० एकर जमीन खंडाने करुन नवी आदर्श लोकांपुढे ठेवला आहे. या खंड शेतीसंबंधीची यशेगाथा त्यांच्याच शब्दात येथे देत आहोत.
– डॉ. सुधीर भोंगळे, संपादक, कृषितीर्थ

“आजकाल शेती करणे फार अवघड झाले आहे. शेती परवडत नाही. त्यातून काही मिळत नाही. उलट घरातूनच पैसा घालावा लागतो. शेतात कामाला मजूर मिळत नाही. मजुरीही फार वाढली आहे. मजूर २-४ तास सुद्धा नीट काम करित नाही. काम न करता पगार मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. नैसर्गिक संकटे आणि वादळवारा व पावसाचे काही विचारू नका. कधी येईल आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते करेल हे काही सांगता येत नाही. हातातोंडाशी आलेला घास तो एका रात्रीत काढून घेतो. शेती हा नुकसानीचा धंदा झाला आहे. शहाण्या माणसाने त्यात पडू नये,” यांसारखी विधाने आपण रोज कुठे ना कुठे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या तोंडूनही ऐकतो. पण शेती करणे कुणी सोडले आहे का? तसे झाले असते तर सगळ्या जमिनी पडीक असत्या आणि माणसांनी अन्न, भाजीपाला, फळे म्हणून काय खाल्ले असते.

शेतकरी हा मोठा हिंमतवान माणूस आहे. तो सहजासहजी निसर्गापुढे हार पत्करत नाही. कितीही संकटे आली तरीही न डगमगता फिनिक्स पक्षासारखा तो राखेतूनही उभा राहतो. झालेले मोठे दुःख, नुकसान दोन चार दिवसात विसरून जातो आणि पुन्हा काळ्या आईची सेवा करायला छातीवर दगड ठेऊन उमेदीने उभा राहतो. शेतीतूनच आपल्याला वैभव प्राप्त होऊ शकणार आहे असा दृढविश्वास ज्यांच्या मनावर स्वार होऊन  अधिराज्य करतो आहे ते कष्टाला, मेहनतीला, संकटाला कधी घाबरतच नाहीत. ते एकजुटीने, एकदिलाने व एकारणेच्या एकांतिक बनलेल्या ध्येयवादाने पछाडून स्वप्नांच्या पूर्तीसाठी कशाचाही तमा न बाळगता वेड्यासारखे दौडत राहतात आणि अखेर इप्सित स्थळी पोहचतात. असे घवघवीत आणि लखलखीत धवल यश अखंड मेहनतीने प्राप्त करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावच्या गोपाल किसन येऊल, संजय येऊल आणि अमोल येऊल या तीन बंधूची यशोगाथा येथे मांडली आहे. ती आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

जमीन काळी कसदार पण निचऱ्याची.

अकोला शहरापासून ७५ कि. मी. आणि आकोट गावापासून ३३ कि. मी. अंतरावर दानापूर नावाचे गाव आहे. ते तेल्हारा तालुक्यात येते. गावातली बहुतांश जमीन अत्यंत काळी कसदार पण पाण्याचा उत्तम निचरा होणारी. पानतांडा हे या गावाचे वैशिष्ट्य. प्रत्येक शेतकऱ्याकडे ५-१० गुंठ्यांपासून १-२ एकरापर्यंत पानमळे असायचे. खायची विड्याची ही पाने ते विक्रीसाठी आकोट, भुसावळ, अमरावती, अकोला येथे पाठवायचे. एकेका शेतात १३ ते १५ वर्षांपर्यंत पानमळा होता. पण सातत्याने मर रोग येऊ लागला. त्यामुळे लोकांनी पानमळे काढून टाकले. आता क्वचितच छोटासा पानतांडा दिसतो. पानांची जागा, कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाल्याच्या पिकांनी घेतली. सुपीक जमीन आणि सघन लागवडीमुळे गावातली सगळीच पिके टुमदार, गर्द हिरवीगार व त्यामुळे ठळकपणे नजरेत भरून डोळ्यात साठवून ठेवावीत अशी. गावातून वान प्रकल्पाचा कालवा जातो. हे धरण दानापूर गावापासून १३ कि. मी. अंतरावर आहे. केव्हा तरी अधून-मधून पाणी सुटते. पण त्यामुळे विहिरी, बोअरवेल यांचे पुर्नभरण व्हायला व पाणी पातळी टिकून राहायला मदत होते. कालव्याची स्थिती, व्यवस्थापन फारसे चांगले नाही. २०१८ मध्ये गावातल्या विहिरी, बोअरवेल पुरेसा पाऊस झालेला नसल्यामुळे आटले होते. पाऊस चांगला झाला तर गावातली नदी डिसेंबर-जानेवारी पर्यंत वाहते. पण वाण धरण दरवर्षी हमखास भरते. या गावाचे भाग्य असे आहे की त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांचा कधी तुटवडा भासत नाही. शेजारच्या सौंदळा, हिवरखेड, पिंपळखेड येथून मजूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. फक्त ते रोज ट्रक वा ट्रॅक्टर मधून आणावे लागते आणि संध्याकाळी परत येऊन सोडावे लागते. शिवाय मध्यप्रदेश राज्याची सीमा १००-१५० कि. मी. अंतरावर आहे. तिथूनही मोठ्या प्रमाणावर मजूर सालाने व रोजंदारीवर उपलब्ध होतात. इतर भागांच्या तुलनेत इथे मजूर थोडा स्वस्त आहे. महिलेला १५० रूपये तर पुरूष मजुराला २०० रूपये रोज आहे. गावात बारी समाजाच्या लोकांची संख्या मोठी असून मारवाडी समाजाची ४५ घरे आहेत. पण बहुतेक सर्व मारवाडी कुटुंबे व्यवसायात असल्यामुळे आणि काही जण अकोला, अकोट यांसारख्या शहरांमध्ये स्थायिक झालेले असल्यामुळे त्यांनी आपल्या जमिनी लोकांना भाडेपट्याने (मक्त्याने) कसण्यासाठी दिलेल्या आहेत वर्षाला एक जमिनीचा खंड १२ हजारापासून ३० हजारापर्यंत आहे. जमिनीचा दर्जा कसा आहे आणि शेतकरी कोणती पिके घेतो यावरून हे भाडे ठरते. गावातील जमिनीचे भावही आता १४ ते १५ लाख रूपये एकर आहेत.

गोपाल येऊलचे धाडस

श्री. किसन राघोजी येऊल या शेतकऱ्याला गोपाल, संजय आणि अमोल अशी तीन मुले. संजय फक्त १२ वी पर्यंत शिकला. तोही शिक्षणासाठी रोज सायकलवरून १३ ते १४ कि. मी. अंतरावरील वरवड बकाल या गावाला जात असे. बाकी दोघांचे शिक्षण जेमतेम सातवी पर्यंत झालेले . वडीलोपार्जित घरची ७ एकर शेती. त्यातल्या एक एकरावर पानतांडा. पण तोही १७-१८ वर्षांपूर्वीच मर (बुरशी) रोगामुळे बंद करावा लागला. गावातल्या सर्व बागा या बुरशीने झोपविल्या. त्यामुळे पानमळ्यापासून मिळणारे रोजचे उत्पन्न बंद झाले, दैनंदिन खर्च भागविण्यासाठी व रोजचे उत्पन्न येण्याकरिता म्हणून १२-१३ वर्षांपासून गावातील लोकांच्या जमिनी भाड्याने (खंडाने) घेऊन त्यावर नगदीची म्हणून भाजीपाल्याची पिके घ्यायला सुरूवात केली. या भाजीपाल्याची रोपेही २००९ पासून आम्ही शेडनेटमध्ये तयार करायला सुरुवात केली. प्रारंभी आमच्याच ७ एकर जमिनीपैकी दीड एकरात टॉमेटो लावला. भाजीपाल्यात पैसे चांगले मिळताहेत हे पाहून गावातील लोकांच्या जमिनी खंडाने घेण्याचा निर्णय करून सुरूवातीला संतोषभाऊ आसाराम गांधी यांची ८८ एकर जमीन घेतली. ती बरेच वर्षे पडीक असल्याने दुरुस्त करून लागवडीखाली आणली. मग हळूहळू विजूभाऊ चांडक यांची २० एकर, श्यामसुंदर व्यास यांची २० एकर, डॉ निमिष हागे यांची १२ एकर जमीन भाड्याने करायला घेतली. सुरूवातीला भाडे १० ते १२ हजार रूपये एकर होते. आता भाडे पिकनिहाय देतो. कपाशी व टोमॅटोसाठी एकरी २४ ते २८ हजार रूपये, हिरव्या लवंगी मिरचीसाठी २५ हजार रूपये खंड देतो. भाडयाने घेतलेल्या जमिनीतून जो फायदा झाला त्यातून आता दोन वर्षात नव्याने स्वतःच्या मालकिची १८.५ एकर जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाच्या मालकीची २५ एकर जमीन झाली आहे. पहिली १०. वर्षे शेतीवर गुंतवणूक करण्यातच गेली. अडीच इंचीचे २५ स्प्रिंकलर सेट घेतले. दोन इंचीचेही २५ तुषार संच घेतले. दरवर्षी ९ ते १० लाख रूपयांचा मल्चिंग पेपर घ्यावा लागतो. आता नव्याने शांती सेठ चांडक यांची १४ लाखरूपये एकर या भावाने ९.५ एकर जमीन खरेदी केली असून त्यात कारल्याची लागवड केली आहे.

हे देखील वाचा :

कारले कडू पण उत्पन्नसाठी गोड

कारले लावलेली जमीन एकदम हलकी व खडकाळ आहे. वेलवर्गीय पिकेच या जमिनीत चांगली येतात. लवकर येतात. म्हणून कारली, दोडकी, काकडी यांसारख्या पिकांचे नियोजन केले आहे. कारल्याची लागवड पाच बाय अडीच फुटावर केली आहे. दोन वेलीतले अंतर अडीच फूट आणि दोन बेडमधले अंतर पाच फूट. ननोस कंपनीची अमन श्री आणि रामपूर कंपनीची व्हीएनआर-२८ या दोन जातीच्या बियाण्यांची लागवड जुलै महिन्याच्या सुरूवातीला केली. बेडवर मल्चिंग पेपर टाकून त्याला छिद्रे पाडली आणि प्रत्येत छिद्रात एक बी टाकले. ८० टक्के उगवण झाली. मल्चिंगवर लागवड केल्यामुळे पाणी कमी लागते. तण होत नाही. पांढऱ्या मुळ्या वर येऊन मरतात. बी लावल्यापासून दीड ते दोन महिन्यात उत्पादन चालू होते आणि ते चार महिने चालते. बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोणता भाजीपाला लावायचा याचा आम्ही निर्णय घेतो. आकोट व अकोला बाजारपेठेत कारली विक्रीसाठी पाठवितो. आकोट आणि अकोला येथे व्यापारी ठरलेले आहेत. प्रतवारी करून माल पाठवितो. साडे चार रूपयांना मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीला छिद्रे पाडून त्यात माल भरतो. छिद्रे पाडल्यामुळे पिशवीत वाफ पकडली जात नाही. १५ किलो, ३०० ग्रॅमची एक पिशवी भरतो. वाहतुकीत माल सुकतो म्हणून ३०० ग्रॅम कारली पिशवीत जास्त भरतो. मालाला माती लागलेली असेल तर कारली धुवून पाठवितो. बाजारात माल पाठविण्यासाठी आम्ही दोन ट्रक स्वतः विकत घेतले असून ते रोज निरनिराळ्या बाजारपेठेत माल घेऊन जातात.

व्हीएनआर-२८ या जातीची कारली आकाराने छोटी असतात. त्यामुळे त्यांना गंमतीने ‘चूहा कारले’ असेही म्हटले जाते. ही कारली नागपूर व अमरावती येथे चालतात. ती कमी कडू असतात. एका वेलीपासून दोन ते अडीच किलो कारली मिळतात. ५ ते ६ दिवसाच्या अंतराने तोडे करावे लागतात. एकूण ६ ते ७ तोडे होतात. या लहान कारल्यांना दर जास्त मिळत असला तरीही माल थोडा कमी निघतो.

अमन श्री जातीची कारली आकाराने मोठी व लांब असतात. जास्त कडू असतात. एका वेली पासून ५ ते ६ किलो कारली मिळतात. सिंगल तारेवर सुतळीने वेल बांधावे लागतात. लावण्याच्या अगोदर बेसल डोस म्हणून एकरी दीड पोते डीएपी टाकतो. सहा इंच उंचीच्या बेडवर २७ मायक्रॉनचे प्लॅस्टिक अंथरून त्याला मशिनने भोके पाडतो. कारल्याला आत्तापर्यंत किलोला १५ ते १८ रूपयांपर्यंत भाव मिळाला आहे..

मुख्य पीक टोमॅटो व मिरची

भाजीपाल्याच्या पिकामध्ये मुख्य पीक व जास्तीचे क्षेत्र हे टोमॅटो आणि मिरचीचे असते. या पिकाची रोपे अगोदर तयार करतो. त्यासाठी १० गुंठ्यांचे शेडनेट तयार केले आहे. वर्षांतून तीनदा म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि डिसेंबर या तीन महिन्यात टोमॅटो व मिरचीची रोपे तयार करतो.

तीन हजार ट्रेमध्ये एकावेळी १०४ म्हणजे तीन ते सव्वा तीन लाख रोपे एका टप्प्यात तयार होतात. २५ ते २८ दिवसात ही रोपे लागणीसाठी तयार होतात. पाच बाय सव्वा फूट अंतरावर रोपांची लागण करतो. एकरी ६८०० रोपे लागतात. एक रोप तयार करायला ७० ते७५ पैसे खर्च येतो. रोपांवर औषधांच्या तीन फवारण्या घ्याव्या लागतात. वातावरण बदलले तर जास्त घ्याव्या लागतात. शेडनेटमध्ये

३ ते ४ माणसांव्यतिरिक्त इतरांना येऊ देत नाही. गोपाल भाऊ स्वतः पाणी मारतात आणि औषधांचा फवाराही देतात. ११ वर्षांपासून मिरची लावित असून ३७ एकरावर मिरची आहे. मिरचीसाठी बीओएसएफची १००३ ही व्हरायटी लावतो आणि टॉमेटोसाठी सेन्जेटाची १०५७ व सेमिनोस कंपनीची आर्यमन या व्हरायटी लावतो. टोमॅटो आणि मिरचीच्या पिकाला धरणातले पाणी चालत नाही. कारण त्यात क्षाराचे प्रमाण जास्त असते. म्हणून आम्ही या पिकांना बोअर व विहीरीचे पाणी वापरतो.

टोमॅटो लागवड

पाच बाय सव्वा फूटावर लागवड करतो. २५ ते २८ दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होतात. एकरी ६८०० रोपे लागतात. ६ ते ७ महिने पिक चालते. लागवडीनंतर तीन महिन्यांनी उत्पादन सुरु होते. तार आणि सुतळीने झाड बांधून सरळ वाढवित नेतो. एका झाडाला ५ ते ६ किलो टोमॅटो मिळतात. एकरी १८०० ते २२०० कॅरेट माल निघतो. एक कॅरेट २२ ते २३ किलोचा असतो. एकरी ४१ हजार ४०० किलो ( ४१४ क्विंटल) म्हणजे ४० ते ४२ टन माल निघतो. गेल्या १६-१७ वर्षांपासून टोमॅटोचे पिक घेत असून आत्तापर्यंत तीन ते चार वेळा गारपीट, वादळ, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. टोमॅटो मुंबई व नागपूरला पाठवितो. १४ तासात वाशी मार्केटला आणि ६ तासात नागपूर मार्केटमध्ये माल पोहोचतो. क्रेटमधून माल बाजारात जातो.. टोमॅटोसाठी ब्लूकॉपर, स्कोअर कवच आणि अॅमेस्टार या बुरशी नाशकांचा तर अळीच्या नियंत्रणासाठी कोर्रेजन, प्रोक्लेम फवारतो. ६ ते ७ दिवसांनी फवारणी करावी लागते. पण वातावरणावर ती अवलंबून असते. वातावरण बदलले तर व्हायरस लगेच येतो. मग दोन दिवसांनी देखील फवारणी करावी लागते. ६ ते ७ फवारणी पंप रोज चालू असतात.

हिरव्या मिरचीची लागवड

जुलै २०२१ मध्ये १५ एकरात हिरवी मिरची लावली आहे. २००३ आणि व्हीएनआर सुनिधी या दोन व्हरायटी लावल्या असून ऑगस्टच्या शेवटापासून तोडणीला प्रारंभ झाला आहे. रोप लावल्यापासून ६० दिवसात मिरची तोडायला येते. मिरचीच्या पिकात एकरी सव्वाशे ट्रॅप (पिवळ्या रंगाचा तेलकट कागद) लावले आहेत. १५ एकरात एकूण २००० ट्रॅप लावले असून ते झाड जसे वाढत जाईल त्याप्रमाणे उंच करता येतात. लोखंडी असारीला हे ट्रॅप लावले असून ते कमी-जास्त करता येतात. १००३ या व्हरायटीचे एकरी ३०० ते ३५० क्विंटल आणि व्हीएनआर सुनिधीचे एकरी २०० ते २२५ क्विंटल उत्पादन येते.
मेहनतीचे कौतुक किती करावे?

विदर्भातला शेतकरी आळशी आहे, तो कष्ट करायला फारसा तयार नसतो असे आजपर्यंत आपण सर्वांनी अनेकदा ऐकले आहे. अजूनही बरेच लोक तसेच बोलतात. पण येऊल कुटुंब खरोखरच त्याला अपवाद आहे. कुटुंबातील तिघे भाऊ एकजीवाने राबून १८० एकर जमीन कसतात याचेच सर्वांना नवल वाटते. या कुटुंबाने रोज २०० ते २५० लोकांना रोजगार (मजुरी) दिला असून दर आठवड्याला ३ लाख रूपये मजुरीपोटी वाटप करतात. ठेक्या पोटी जमीन मालकांना दरवर्षी ३२ ते ४० लाख रूपये देतात आणि कृषी सेवा केंद्राचे ४७ ते ५० लाखांचे बील भरतात. कोरोना काळात व लॉकडाऊन असताना इतरत्र मजुरांना काम नव्हते. पण येऊल कुटुंबाने त्या काळातही रोज २५० लोकांना रोजगार दिला. त्यामुळे मजूर आता गोपाल भाऊंना देवच समजू लागले आहेत. फारसे उच्च शिक्षण नसतानाही तीनही बंधू ज्या उत्तमरितीने शेती करतायेत तो आदर्श इतरांनीही घ्यायला हवा. सुदैवाने विदर्भात आजही बऱ्याच लोकांकडे जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण कष्ट व मेहनत करून उत्पन्न मिळविण्याची इच्छा फारथोड्या लोकांमध्येच पाहायला मिळते. पीक पद्धतीतला बदलही अनिवार्य आहे.

साभार : कृषितीर्थ (अंक-सप्टेंबर २०२१)

हे देखील वाचा :

हे देखील वाचा