मान्सूनचे आगमन झाले की नाही? वाचा काय आहे गोंधळ

mansoon

मुंबई : भारतीय हवामान खात्याने २९ मे रोजीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा केली होती. मात्र यावर काही तज्ञांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याने निर्माण झालेल्या गोंधळामुळे देशात मान्सून दाखल झाला की नाही? असा प्रश्‍न शेतकर्‍यांसह अनेकांना पडला आहे.

मान्सूनच्या आगमनाबाबत सर्वाधिक उत्सुकता असते ती शेतकर्‍यांना कारण पावसावरच शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. मान्सूचे आगमन व पावसाचा अंदाज या दोन गोष्टींवर शेतकरी नियोजन करत असतो. यात हवामान खात्याचे भुमिका सर्वाधिक महत्वाची असते. कारण हवामान खात्याच्या अंदाजावरच शेतकर्‍याचे नियोजन ठरते. मात्र आता मान्सूनच्या आगमनावरुन निर्माण झालेल्या दावे-प्रतिदाव्यांमुळे शेतकरी गोंधळात पडला आहे.

यंदा मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याचे एप्रिल महिन्यातच घोषित करण्यात आले होते. त्यानुसार २९ मे रोजी म्हणजेच ३ दिवस मान्सून केरळात दाखल झाल्याची घोषणाही करण्यात आली. मान्सूनच्या आगमनाबाबत काही निकष असतात, ते पूर्ण झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा केली जाते. मान्सून दाखल होण्याची घोषणा करण्यापूर्वी केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकातील ८ स्टेशनवर दोन दिवस किमान अडीच मिलिमीटर पाऊस हा पडतोच. त्यानंतरच मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली जाते. मात्र, ज्यावेळी हवामान विभागाने मान्सून आल्याची घोषणा केली तेव्हा केवळ ५ ठिकाणीच २.५ मिमी पावसाची नोंद झाली असल्याचा दावा करण्यात आल्याने देशात मान्सूनचे खरोखरच आगमन झाले आहे का असा संभ्रम निर्माण झाला आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार कोट्टायम, कोल्लम, अलाप्पुझा, वायनाड आणि एर्नाकुलममध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. मात्र, किती प्रमाणात पडला याची सर्वकश माहिती उपलब्ध झालेली नव्हती. सलग दोन दिवस पावसाची हजेरी लागल्यावरच मान्सून आल्याचे मानले जाते असे स्कायमेटचेही म्हणणे आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सून मुंबईमध्ये दहा जून नंतरच दाखल होणार आहे. या वर्षी मान्सून हा दमदार राहणार आहे. देशातील बहुतांशी भागात मान्सूनचा समाधानकारक पाऊस बघायला मिळणार आहे. यंदा १०६ टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारताच्या उत्तर पूर्व भागात सरासरीपेक्षा पाऊस हा कमी राहणार असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

देशात या वर्षी संपूर्ण मान्सून हंगामात आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता आता वर्तवली जातं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, या मान्सून हंगामात सरासरी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १०३ टक्के असण्याची शक्यता आहे.

Exit mobile version