शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी : येत्या ४८ तासांत मान्सूनचे केरळात आगमन!

mansoon

मुंबई : मान्सून २७ तारखेला केरळात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसून येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

असनी चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या आगमानवर झाल्यामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडत आहे. मात्र आता केरळात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वार्‍यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता
पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात अंशतः ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान शनिवारी (ता. २८) विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली. या जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वायव्य राजस्थानपासून ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर उत्तर कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Exit mobile version