शेतकर्‍यांसाठी खूशखबर.. मान्सून १० दिवस आधीच धडकणार

rain

नवी दिल्ली : देशात यावर्षी मान्सून १० दिवस आधीच धडकण्याची आनंदवार्ता मिळाली आहे. सध्या बंगालच्या खाडीत हवामानातील बदलांचे संकेत मिळत आहेत, त्यानुसार अरबी समुद्रात एन्टसायक्नोलन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून लवकर केरळमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे लवकर पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळच्या समुद्रकिनार्‍यांवर २० किंवा २१ मे रोजीच मान्सून धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो देशात इतर भागात पोहचेल. युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज् वेदर फोरकास्ट या संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे.

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने वेळेवरच मान्सून येईल, असे सांगितले आहे. सध्याच्या सॅटेलाईट इमेजेसवरुन मान्सून वेळेवर दाखल होईल, त्यात उशीर होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्यानुसार केरळमध्ये मान्सून १ जूनला पोहचेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भूमध्य रेषेजवळ ढगांचा एक समूह तयार झाला आहे, जो बराच सक्रिय आहे. मान्सूनची प्रक्रिया लवकरच सुरु होईल याचे हे संकेत असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेसनेही मान्सून अपेक्षित वेळेच्या आसपास योईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

देशातील एकूण शेतकर्‍यांच्या संख्येच्या ४० टक्के शेतकरी हे पेरणीसाठी पावसावर अवलंबून आहेत. शेतकरीवर्ग या मान्सूनकडे डोळे लावून बसलेला असतो. यापूर्वी देशाच्या हवामान विभागाने सलग चौथ्या वर्षी यंदा मान्सून वेळेवर आणि सुरळीत पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version