अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतीवर नवं संकट

avkali-paus

नागपूर : विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेती व शेतकऱ्यांवर पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.

अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले असून नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील फळबागांनाही याचा मोठा फटका बसला असून द्राक्ष, डाळिंब या फळबागांनाही मोठा फटका आहे. या गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी, संत्रा व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले. या गारपिटीसह पडलेल्या पावसाने तूर व कांदा या दोन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वेचणीला आलेला कापूस ओला झाल्यामुळे शेतकर्‍याची चिंता वाढली आहे. उशिराच्या कापूस विक्रीवरही या पावसाचा मोठा परिणाम होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

संत्रे पिकाला मोठा धोका

गारपिटीने संत्र्याचा बहार हातातून जाण्याची शक्यता आहे. तूर, हरभरा, कांद्यालाही गारपिटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. फुलोर्‍यावर असलेल्या तूर आणि हरभरर्‍याचं पावसानं नुकसान होणार आहे. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, सुर्यफूल ही पीके बहरात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. ज्वारी पीक तर पोटर्‍यात आले असून ज्वारीची कणसे भरण्यासाठी पोषक असणारा चिकटाच या पावसामुळे धुऊन गेल्याने उत्पादनात वाढ कशी होणार असा सवाल आता शेतकर्‍यांसमोर आहे. त्यामुळे महिन्याभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले होते तर आता गारपीट आणि पावसामुळे रब्बी हंगामातील पीके धोक्यात आहेत.

ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा प्रादुर्भाव

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीचे तर नुकसान झालेच आहे पण ज्या हरभरा पिकातून शेतकर्‍ऱ्यांना मोठ्या उत्पादनाच्या अपेक्षा आहेत ते पीक देखील आता धोक्यात आहे. एकतर रब्बी हंगामातील पेरण्या यंदा उशिराने झालेल्या आहेत. यातच आता पावसाने पिकांच्या वाढीवर परिणाम असून किडीचा प्रादुर्भाव हा वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये आणखीन भर पडलेली आहे.

कापूस, तुरीचे न भरुन निघणारे नुकसान

यंदा कापसाला अधिकचा दर आहे म्हणून शेतकऱ्यांनी फरदड कापसाचे उत्पादन घेतले आहे. मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव तर वाढणारच आहे पण पावसामुळे कापसाच्या बोंडाचेही नुकासान झाले आहे. दुसरीकडे तुरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काढणी झालेली तूर वावरातच पडून आहे. यापूर्वीच शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे शेंगा भरल्या नव्हत्या आता पावसामुळे तुरीचे खळेही होते की नाही अशी अवस्था झाली आहे.

Exit mobile version