पहाटे साडेतीन वाजता भाजीपाला बाजारात घेऊन जाणाऱ्या तरुणाने उभारली 500 कोटींची कंपनी

nitin-godse

अहमदनगर : पहाटे साडेतीन वाजता उठून भाजीपाला भरलेला गाडा बाजारात घेऊन स्वतः विकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द आणि चिकटीच्या जोरावर तब्बल 500 कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी सुरू केली आहे. नितीन नामक तरुणाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादाई आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात नितीनचा जन्म झाला. नितीन गोडसे (Nitin Godse) यांचे वडील अत्यंत तोडक्या पगारावर एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचे. तेवढ्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे खूप अवघड होते. नितीन हा ३ भावंडात मोठा. त्याला परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावावा वाटला. तो एका दुकानात सेल्समन म्हणून काम करू लागला.

नितीनला इंजिनिअरिंग करायची होती. पण त्याचे इंजिनिअरिंगचे स्वप्न परिस्थितीमुळे पूर्ण होणे कठीण होतं. त्याने आपल्या कामासोबत शिक्षण चालू ठेवले होते. शालेय शिक्षण झाल्यावर अखेर त्याने आपले इंजिनिअरिंग चे स्वप्न सोडले आणि बीएस्सी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1992 मध्ये नितीनला एका कंपनीत सुपरवायझरची नोकरी मिळाली.

नोकरी करताना पुन्हा नितीनला उच्चशिक्षण खुणावू लागले. त्याने नंतर एम. बी. ए. करण्याचा निर्णय घेतला. एमबीए झाल्यानंतर नितीनला एका कृषी कंपनीत नोकरी देखील मिळाली. कंपनी ताज्या भाज्या पॅक करून बाजारात विकायची.

शेतकरी कुटुंबातून आलेला नितीन इतका प्रभावित झाला की त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नीतीनकडे या व्यवसायासाठी भांडवल काही नव्हते पण व्यवसाय तर सुरु करायचा होता. त्याने मित्रांना मदतीसाठी विचारले आणि मित्राने पण पाच लाख उसने दिले. तो पहाटे साडेतीन वाजता उठून भाजीपाला भरलेला गाडा बाजारात घेऊन जायचा आणि तो स्वतः विकायचा. नितीनला या व्यवसायातून फारसा नफा मिळत नसल्याने तो बंद करावा लागला. व्यवसाय बंद केल्यानंतर त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी गॅस कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली.

नितीनने ३ वर्षे काम करून निधी उभारला. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी गॅस हाताळणी यंत्रणा, सिलेंडर ट्रॉली, गॅस कॅबिनेट बनवणारी कंपनी सुरू केली. नितीनने या प्रकल्पाला ‘एक्सेल गॅस अँड अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ असे नाव दिले. नितीनचा हा व्यवसाय हळू हळू बहरत गेला. आज त्यांची कंपनी करोडोमधे उलाढाल करत आहे. नितीनच्या कंपनीची आज वार्षिक उलाढाल 500 कोटी रुपये आहे. (Excel Gas Founder Nitin Godse Success Story)

कंपनीत सध्या 150 हून अधिक कायम कर्मचारी आहेत. बड्या कंपन्या नितीनच्या कंपनीचे ग्राहक आहेत. आयुष्यातील सर्व अडचणींना तोंड देत नितीनने स्वतःमध्ये बदल केले आणि आपले हे यश मिळवले आहे. त्यांनी ध्येयाकडे जाताना अनेक अडचणींचा सामना केला पण ते कधी खचले नाहीत. आज त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे.

Exit mobile version