शेतकर्‍यांनो इकडे लक्ष द्या; येत्या चार दिवसात पुन्हा मुसळधार!

rain 1

मुंबई : संपूर्ण राज्याला अक्षरश: झोडपून काढल्यानंतर काहशी विश्रांती घेतलेल्या पावासाचे पुन्हा दमदार पुनरार्गमन होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून, शनिवारसह रविवारी पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

जुलै महिन्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे राज्यातील सर्व धरणे तुडूंब भरली आहेत. यामुळे येणार्‍या काळात पिण्यासह सिंचनाचा प्रश्‍न जरी मिटला असला तरी अजून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून आहे. वाफसा होत नसल्याने पिकं सडू लागली आहेत. गत चार दिवसांपासून सुर्याचे दर्शन होत असल्याने मशागतीसह किटकनाशक व युरीया फवारणीची वेळ शेतकर्‍यांना मिळाली मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने शेतकर्‍यांची जीव भांड्यात पडला आहे.

गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असली, तरी मुंबईकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मुंबईवर दाटून येणारे ढग गर्दी करत असले, तरी प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत आहे. २३ आणि २४ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल; शिवाय मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना इशारा
२३ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
२४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव.

Exit mobile version