अतिवृष्टीनंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची अशी झालीय स्थिती; सर्वाधिक नुकसान या पिकाचे होणार

farmer

जळगाव : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झाले. त्यातून कसेबसे सावरत शेतकर्‍यांनी उरलेल्या पिकांना जगवले. मात्र त्यानंतर पावसाने जी दडी मारली आहे, की सप्टेंबर महिना उजाडायला आला तर बेपत्ता पावसाचे दर्शन झालेले नाही. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात पिकं माना टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वाधिक फटका मका पिकाला बसला असून त्यापाठोपाठ कापसाचे नुकसान होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात विशेषत: जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात अपेक्षित सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परंतु ऑगस्ट पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात मागील तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आंतरमशागतीची कामे करता आली असली तरी पावसाअभावी पिकं सुकू लागली आहेत. उष्ण वातावरणामुळे मातीचा वरचा थरातील ओलावा कमी झाला आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत. बरड, हलक्या, माळरान जमिनीवरील पिके उन्हात सुकू लागली आहेत. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. मात्र कोरडवाहू जमिनीवरील पिकांसाठी लवकर पाऊस पडणे आवश्यक आहे. अन्यथा उत्पादकतेत घट येऊ शकते.

सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीनचे पीक फुलोरा, शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. कपाशी पाते, फुले, बोंडे भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर, ज्वारी, बाजरी, हळद आदी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मूग, उडीद शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. काही भागांत लवकर पेरणी केलेल्या मुगाची तोडणी सुरू आहे. अनेक भागांत सोयाबीनवर शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पाण्याअभावी मक्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून उत्पादनात ४० ते ६० टक्के घट येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version