राज्यात पुन्हा अतिवृष्टीची इशारा; येत्या पाच दिवसांत या जिल्ह्यांत मुसळधार पाऊसाचा अंदाज

rain-weather-updates

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहिशी विश्रांती घेतली असली तरी पुढचे ५ दिवस पुन्हा पाऊस सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने रखडलेली शेतीकामेही मार्गी लागली होती. पण १५ दिवसानंतर पाऊस पुन्हा सक्रीय होत असलेला हा पाऊस अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार स्वरुपात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. याआधी ऑगस्टमध्ये सर्वसाधारणच पाऊस राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा धोका वाढला आहे. पुढील २४ तासांमध्ये म्हणजेच शनिवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून, येत्या पाच दिवसांमध्ये नाशिक, पुण्यासह पालघर, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरातही येत्या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो. सातारा परिसरामध्ये सोमवारी हा पाऊस अती तीव्र मुसळधार म्हणजे २०० मिलीमीटरहून अधिक नोंदला जाण्याचाही इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

मात्र, सांगलीकडे पावसाने अजूनही पाठ फिरवलेलीच दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात या काळातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सांगली जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक तूट आहे. रत्नागिरीमध्ये पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडमध्येही मंगळवारपर्यंत ऑरेंज अ‍ॅलर्ट आहे. रायगड जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, ठाणे येथेही सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर वाढू शकतो. तर मुंबईत मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातही सोमवार, मंगळवारी पावसाचा जोर अधिक असू शकेल. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मंगळवारी ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे रविवार ते मंगळवार या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भातही तुरळक ठिकाणी रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. भंडारा येथे मंगळवारी तर चंद्रपूर येथे रविवारी आणि मंगळवारी, गडचिरोली येथे रविवार ते मंगळवार तर गोंदिया जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी ऑरेंज अ‍ॅलर्ट आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा येथे पुढील याच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वाशिम आणि यवतमाळ येथे शनिवार आणि रविवारी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

तर खरिप हंगाम हातातून जाणार
यंदा खरिपातील पेरणी होताच राज्यात मुसळधार पाऊस झाला होता शिवाय पावसामध्ये तब्बल एक महिना सातत्यही होते. त्यामुळे सातत्याने पावसाचे पाणी शेतजमिनीमध्ये साचून राहिले तर अनेक ठिकाणी जमिनीही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता कुठे पिके बहरू लागली होती. पीक वाढीच्या अनुशंगाने शेतकर्‍यांनी मशागतीची कामे केली पण आता पाऊस झाला तर मात्र, खरीप हातचा गेलाच अशी स्थिती आहे. यामुळे शेतकर्‍यांचे टेन्शन वाढले आहे.

Exit mobile version