पावसाची तुफान बॅटींग; सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

rain 1

मुंबई : बंगालच्या उपसागरासह मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मान्सून दक्षिणेकडे सरकला आहे, तर अरबी समुद्रावरून जोरदार प्रवाह वाहत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मंगळवार व बुधवारी रायगड, ठाणे, मुंबई येथे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने कोकण, मुंबईसह ४ दिवस हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला असून सहा जिल्ह्यांना रेड तर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मंगळवारी कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस झाला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, माथेरान, ठाणे, मुंबई, गोंदिया, गडचिरोली, अकोला या जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळाला, तर कोल्हापुरातही कोसळधार सुरूच आहे. विदर्भातील अनेक शहरांत जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.

कोकणात पूरस्थिती
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर होता. रत्नागिरी जिल्ह्यात लांजात सर्वाधिक पाऊस ३४२ मिलीमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी
कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.
विदर्भात अमरावती, वर्धा, गोंदियात पूर
विदर्भात अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. वर्धा, गोंदियात अतिवृष्टी झाली. अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला.

राज्यातील या प्रमुख शहरांना हवामान खात्याचा अलर्ट
६ जुलै
रेड अलर्ट : रायगड, रत्नागिरी कोल्हापूर, सातारा
ऑरेंज : पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे
ग्रीन : धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद
७ जुलै
रेड अलर्ट : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा
यलो : जालना, औरंगाबाद परभणी, हिंगोली
ग्रीन : धुळे, जळगाव, नगर, बीड, लातूर
८ जुलै
रेड अलर्ट : पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा
ऑरेंज : नाशिक, पुुणे, सिंधुदुर्ग
यलो : औरंगाबाद, जालना, नगर, जळगाव, नंदुरबार

Exit mobile version