औरंगाबाद : शेती परवडत नाही म्हणून अनेकजण शेतीपासून लांब जात आहेत. शेतीपेक्षा नोकरी बरी, अशी भावना शेतकर्यांच्या मुलांमध्ये रुजत आहे. मात्र एका उच्च शिक्षित तरुणीने जर्मनीतील नोकरी सोडून दुग्ध व्यवसाय सुरु करण्याचे धाडस केले आहे. विशेष म्हणजे अल्पधीत यश मिळवत त्या तरुणीने दुधाची ३०० पेक्षा जास्त उत्पादने तयार केली असून वर्षभरात ३३ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे.
मूळ राजस्थानातील अंकिताने शिक्षण पूर्ण करुन सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करण्यासाठी जर्मनीत गेली. काही वर्ष नामांकित कंपनीत उच्च पदांवर काम केल्यानंतरही तिला नोकरी करण्यापेक्षा उद्योजक होण्यात जास्त रस होता. आपण काय करु शकतो, याची पूर्ण चाचपणी केल्या नंतर तिने दुग्ध व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेत जर्मनीतील नोकरीचा राजीनामा दिला व आपले मुळ गाव नसीराबाद गाठले. सुरुवातीला ७ लाख रुपयांची गुंतवणूक करुन ७ गायी खरेदी केल्या व आपल्या वडिलांच्या जमिनीवर पाळल्या.
सुरुवातीला लोकांना देशी गायीचे दूध आणि इतर दुधावर आधारित उत्पादने खरेदी करण्यासाठी पटवणे कठीण होते. मात्र जिद्दीने आपली उत्पादने कशी सरस आहेत, हे तिने लोकांना पटवून दिले. यासाठी तिला घरोघरी जावून मार्केटिंक करावी लागली. सुरुवातीला ती स्वत: वितरक म्हणून ग्राहकांच्या घरी जावून उत्पादने देत होती.
सध्या, अंकिताने ३०० हून अधिक सेंद्रिय उत्पादनांमध्ये विविधता आणली आहे ज्यात मसाले, दुधावर आधारित उत्पादने, मैदा, स्नॅक्स इत्यादींचा समावेश आहे. तिने नमूद केले की तिचे वडील आणि पती तिला व्यवसायात मदत करत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात तिने ३३ लाख रुपयांचा नफा कमावल्याचा दावा केला. अंकिता सारख्या उच्च शिक्षित तरुणीचा हा प्रवास खरोखरच अनेकांना प्रेरणा देणारा आहे.