राज्यात पुढील तीन दिवसात ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज

weather-updates-rain

फोटो क्रेडिट : Times of India

शेतशिवार । पुणे : गेल्या २ दिवसात राज्यात पुन्हा थंडीने जोर पकडला असतांना आता पुन्हा बेमोसमी पावसाची शक्यता असल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळेच पुढील तीन दिवसात राज्यात ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. या बेमोसमी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवसात पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली असून कोणत्याही भागात पाऊस झालेला नाही. विविध ठिकाणी ढगाळ हवामान होते. राज्यात सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरीत, तर सर्वात कमी १०.९ अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.

Exit mobile version