शेळीपालनाचा विचार करताय? या आहेत फायदे देणार्‍या जाती

goat

कोल्हापूर : शेळीपालन हा फायदेशिर शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. शेळीपालनाचे फायदे शेतकर्‍यांना समजल्याने अनेक शेतकरी शेती जोडधंदा म्हणून शेळीपालनाला प्रथम प्राधान्य देतात. महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी, कोकण कन्याळ आणि सुरती जातीच्या शेळ्या आढळतात. या सर्वांचे फायदे काय आहेत, त्यांची निगा कशी राखावी, त्यांना आहार कसा द्यावा, गोठ्याची व्यवस्था कशी असावी? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

१) उस्मानाबादी
उस्मानाबादी शेळी ही राज्यातील शेळ्यांची प्रमुख जात असून ती नावाप्रमाणे उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी आणि त्या लगत असणार्‍या अहमदनगर,
सोलापूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. या शेळ्यांमधील मांस आणि दूध हे उभय गुण असून त्या दरवर्षी नियमाने वितात, या शेळ्यांमध्ये ५० ते ५५ टक्के जुळे, ३ ते ५ टक्के तिळे करडांना जन्म देण्याची क्षमता आहे. या शेळ्या सरासरी २१० दिवसांच्या कालावधीमध्ये १८० किलो दूध देतात.

२) संगमनेरी
या शेळ्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका तसेच पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आढळतात. या शेळ्यामध्ये मांस आणि दूध असे उभयगुण असून त्यांच्यामध्ये जुळ्याचे प्रमाण ५० ते ५१ टक्के, तिळे ३ ते ४ टक्के, आणि ४० ते ४५ टक्के एकेक करडे देण्याचे प्रमाण आढळते. संगमनेरी शेळ्या १६८ दिवसाच्या कालावधीमध्ये ८५ किलोपर्यंत दूध देतात.

३) सुरती
गुजरात राज्याच्या सुरत जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये या शेळ्या आढळतात. १६५ दिवसाच्या वेतामध्ये १५० किलो दूध देतात.

४) बेरारी
या जातीच्या शेळ्या प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यामध्ये आढळतात. या शेळ्या मांसासाठी प्रसिद्ध असून या रोज सरासरी ५०० ते ७०० मि.ली. दूध देतात.

५) कोकण कन्याळ
या शेळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण परिसरामध्ये आढळतात. या शेळ्यांमध्ये जुळे देण्याची क्षमता ३४ ते ३७ टक्के
आढळते आणि एका वेतामध्ये सरासरी ६० किलो दूध देतात.

शेळ्यांसाठी आहार व पाणी
शेळ्यांना विविध प्रकारचा झाडपाला आवडतो. झाडांची कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा त्या आवडीने खातात. शेळीला तिच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने एका प्रौढ शेळीस दररोज साधारणत: तीन ते चार किलो हिरवा चारा, ७५० ग्रॅम ते १ किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पूर्ततेसाठी २०० ते २५० ग्रॅम संतुलित आहार प्रतिदिन द्यावा. साधारणपणे शेळीच्या प्रत्येक किलो वजनामागे १५० मि.ली. एवढी रोजची पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे ४० किलो वजनाच्या शेळीला ५ ते ६ ली. पाणी दररोज लागते. दूध देणार्‍या शेळ्या मात्र दर लीटर दुधामागे १.५ ली. पाणी जास्त पितात.

शेळीपालनासाठी अशा पध्दतीने करा गोठ्याचे नियोजन
प्रत्येक शेळीसाठी गोठ्यात १० चौ.फूट व मोकळी २० चौ. फूट जागा असावी. ३० बाय× २० फूटाच्या गोठ्यात ६० शेळ्या चांगल्या ठेवता येतात. गोठ्याच्या दोन्ही बाजूस तितकीच जागा ठेवून कुंपण घालावे. गोठ्याचे छप्पर उंच ठेवावे व ते दोन्ही बाजूस उतरते असावे. गोठ्याच्या आत चारा टाकण्यासाठी जमिनीपासून १ ते १.५ फूट उंचीवर गव्हाण असावी. पाण्याची व्यवस्था गोठ्याच्या बाहेरील हौद किंवा सिमेंटचे अर्धे पाइप ठेवून करावी.

Exit mobile version