साडेतीन एकसाठी १२ हजार रुपये खर्च करुन २ लाखांचे उत्पन्न! वाचा कसे?

chia seeds

उस्मानाबाद : औषधी गुणधर्म असलेल्या पीकांकडे अनेक शेतकर्‍यांचा ओढा वाढत आहे. कारण हा प्रयोग धाडसी जरी असला तरी कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पन्न व योग्य दर मिळण्याची हमी असते. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नामदेव माकोडे या शेतकर्‍याने आयुर्वेदिक औषधे असणारे चिया बियाणाचे उत्पन्न घेण्याचे धाडस केले आहे.

पारंपारिक पीक घेण्याऐवजी नवे प्रयोग करण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येवू लागले आहेत. नामदेव माकोडे या तरुण शेतकर्‍याच्या प्रयोगामुळे कळंब सारख्या तालुक्यातील शिराढोणच्या शिवारात चिया बियाणाचे पिक बहरत आहे. चिया बियाणे हे इतर खाद्य बियाणा प्रमाणेच आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक आणि औषधी गुणधर्मामुळे खाण्यामध्ये त्याचा वापर करतात. आरोग्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा अधिकचा उपयोग होतो.

राज्यातील काही बाजारपेठांमध्ये या बियाणांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर माकोडे यांनी चिया बियाणे लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी हरियाणा येथून ऑनलाइॅन पध्दतीने बियाणे मागविले. चिया बियाणांची लागवड केल्यापासून तीन महिने १५ दिवसांमध्ये उत्पादन मिळते. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आली होती तर आता हे पीक अंतिम टप्प्यात आहे. साडेतीन एकरातील या पिकासाठी माकोडे यांना केवळ १२ हजार रुपये खर्च आलेला आहे. यामध्ये त्यांना २ लाखाचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे.

चिया बियाणांमध्ये औषधी गुणधर्म

चिया बियाणांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते, चिया बियाणांमध्ये पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जस्त, तांबे, सोडियम फॉस्फरस, मॅगनिज आदी पोषक तत्त्व असतात. यामुळे चिया बियाणांना अधिकची मागणी असते.

हे देखील वाचा :

Exit mobile version