बाजपेठेत अशी आहे लाल मिरचीची स्थिति

red-chilli-market

नंदुरबार : तापमान वाढल्यापासून घरगुती तिखट तसेच मसाला तयार करण्यासाठी लाल मिरचीला मागणी वाढली आहे, परंतु यंदा तुलनेत कमी आवक असल्याने लाल मिरचीचा चांगला तोरा वाढल्याचे चित्र असून ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहे. तुलनेत लवंगी मिरचीचे भाव बऱ्यापैकी स्थिर आहेत.

ऊन तापू लागल्यापासून वर्षभर पुरेल इतका लाल तिखट, मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी वाढली आहे. लाल मिरची प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी भागातून येते. खास लवंगी मिरची आवक सिल्लोड, बुलढाणा आदी भागातून होते, परंतु यंदा आवक कमी आवक असून प्रामुख्याने तेलंगणासह अन्य भागातून माल आल्याचे त्यांनी सांगितले.

जानेवारीपासून लाल मिरचीची आवक बाजारात सुरू झाली आहे. यात बेडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, रसगुल्ला, काश्मिरी, संकेश्वरीसह मागणी असलेली तिखट लवंगी मिरची बाजारात उपलब्ध झाली आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, सिडकोसह शहर परिसरातील विविध मिरची विक्री केंद्र, किराणा दुकाने आदी ठिकाणी लाल मिरची खरेदीसाठी ग्राहकांची चांगली रेलचेल वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

आवक कमी असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेते लाल मिरचीचे भाव दर्जानुसार ८ ते १५ टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या दरवाढीमुळे ग्राहकांना लाल मिरचीचा ठसका बसू लागला आहे. तर मागणी यापेक्षा वाढल्यास भाव तेजीत येतील, अशी शक्यताही विक्रेत्यांनी व्यक्त केले.

मिरचीचे दर – किलोप्रमाणे
लवंगी – १६० ते १८० रुपये
बेडगी – ३२० ते ३५० रुपये
गुंटूर – २०० ते २२० रुपये
चपाटा – २२० ते २५० रुपये
रसगुल्ला – ३२० ते ३४० रुपये
तेजा – २०० ते २३० रुपये
संकेश्वरी – ३५० ते ४०० रुपये
काश्मिरी – ३०० ते ३५० रुपये

Exit mobile version