जे कांद्याबाबत घडले तेच लिंबूला नडले; वाचा काय म्हणतोय शेतकरी

Lemon

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी लिंबूचे दर सफरचंदापेक्षा जास्त झाले होते. २५० रुपये प्रति किलो किंवा १० रुपयांना एक या दराप्रमाणे विकला जाणार्‍या लिंबूचे दर पुन्हा एकदा जमीनीवर आले आहेत. आता बाजारात ५० पैसे किंवा १ रुपये प्रति नगाने लिंबूची विक्री होत आहे. दुसरीकडे हवामानात बदल झाल्यामुळे लिंबूची मागणीही कमी झालेली आहे.

शेतमालाच्या बाजारपेठेतील अस्थिरता शेतकर्‍यांसाठी नेहमीच डोकंदूखी ठरत असते. सध्या बाजारात कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर रडण्याची वेळ आली आहे. अगदी कांदा फेकून देण्याचे किंवा फुकट वाटून देण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती लिंबू उत्पादकांबाबतही दिसून येत आहे.

ऐन हंगामात लिंबाची आवक घटल्याने १० रुपयांना एक लिंबूची विक्री झाली. आता हंगाम अंतिम टप्प्यात आवक वाढल्याने लिंबूचे दर कमालीचे घसरले आहेत. १० रुपयाला असलेले लिंबू आता १ रुपया आणि ५० पैशाला मिळू लागले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. थंडपेयाकडे नागरिक पाठ फिरवत असल्याने लिंबाच्या दरात कमालीची घसरण होत आहे.

शेतीमालाच्या दरातील अनिश्चित व अनियमितपणाचा फटका हा शेतकर्‍यांनाच कायम बसत आहे. यामुळे शेती करावी तरी कशी असा उद्गिग्न सवाल शेतकरी करत आहेत. बाजारात लिंबूची आवक मोठ्या प्रमाणात झाली असतांना बाजारपेठेत मागणी नसल्याचे कारण पुढे करीत व्यापारी आता शेतकर्‍यांकडून मनमानी पध्दतीने लिंबाची खरेदी करु लागले आहेत.

Exit mobile version