गाजराच्या एक एकर शेतीतून शेतकऱ्याने कमविले ‘इतके’ लाख रुपये; असा केला नवा प्रयोग

बीड : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी पारंपारिक पिकांपासून अन्य नव्या प्रयोगांकडे वळतांना दिसत आहेत. शेतीत पीक पध्दतीत बदल करण्याचे महत्व देखील आता शेतकर्‍यांना पटू लागले आहे. पीक पध्दतीत बदल करुन एका शेतकर्‍याने लाखों रुपयांची कमाई करुन दाखविली आहे. हे शेतकरी आहेत, केज तालुक्यातील केकाणवाडी येथील बाबासाहेब केकान… त्यांनी गाजराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करत अवघ्या तीन महिन्यात लाखों रुपयांची कमाई करुन दाखवली आहे.

बाबासाहेब केकाण यांनी गतवर्षी ५ गुंठ्यात गाजराची लागवड केली होती त्यातून त्यांनी २५ हजार रुपयांचा नफा कमविला. या प्रयोगामुळे त्यांना गाजराच्या शेतीचे महत्व व तंत्र देखील कळाले. यामुळे पुढच्या हंगामात त्यांनी एक एकरात गाजराची लागवड केली. लागवड करतांना संक्रातीच्या सणामध्ये गाजराची बाजारपेठेत विक्री करता यायला हवी, याचेही नियोजन त्यांनी केले. त्यानुसारच त्यांनी संक्राती दरम्यानच्या तीन दिवसात २० क्विंटल गाजराची विक्री करून ५० हजार रुपये कमावले. आतापर्यंत गाजराच्या एकरी उत्पादनातून त्यांनी २ लाख रुपयांची कमाई केली आहे.

अशा पध्दतीने केली लागवड व खताचे नियोजन

गाजराचे पीक तीन महिन्याचे असून लागवडीपूर्वी नांगरणी, मोगडा, एक बैल पाळी अशी पेरणीपूर्व मशागत केली. त्यानंतर ऑक्टोंबर अखेर एकरी दहा किलो ग्रॅम याप्रमाणे गाजराचे बियाणे फेक पद्धतीने लागवड करण्यात आले. चांगल्या पद्धतीने उगवण व्हावी यासाठी सुरुवातीला पाण्याची एक पाळी आणि त्यानंतर महिनाभरानंतर दुसरी पाळी देण्यात आली. एक पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक पोते डीएपी खताची मात्रा देण्यात आली होती. गाजराची संपूर्ण वाढ होण्याचा एकूण कालावधी ९० दिवसाचा आहे.

Exit mobile version