लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासन करणार ; पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील

lumpy 1

मुंबई : जनावरांवर लम्पी स्कीन या नावाचा आजार आला असून यामुळे देशातील पशुपालक सध्या चिंतेत आहे. महाराष्ट्रातही जवळपास 22 हुन अधिक जिल्ह्यात लम्पी स्कीन या आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला असून पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान, लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. तसेच तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार असल्याचेही विखे पाटील म्हणाले.

पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी असे देखील विखे पाटील यावेळी म्हणाले. खासगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रुपये प्रमाणे मानधन सुरु करावं. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लंपी चर्म आजाराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा असेही विखे पाटील यावेळी म्हणालं.

राज्य शासनाने वेळेत उपाययोजना केल्याने हा आजार नियंत्रणात असल्याचे विखे पाटील म्हणाले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आल्याने देशातील अन्य राज्यांच्या तूलनेत या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. आजारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन पाच किलोमीटर परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून, येत्या काळात हा वेग अधीक वाढेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लम्पी स्कीन रोगाची लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा
मृत जनावरांसाठी गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासरु 16 हजार याप्रमाणे मदत देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल आणि राज्य पातळीवरील हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर देखील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हशींवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने म्हशींच्या संदर्भातील केंद्र सरकारची मंजुरी घेऊन बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. पशुपालकांनी भयभित न होता जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाची लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील विखे पाटील यांनी केलं.

Exit mobile version