शेतशिवाराचा कायापालट करण्यासाठी राज्यात ५ हजार १४२ गावांमध्ये राबवणार ‘ही’ योजना; कृषी मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

dadaji-bhuse

नाशिक : राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकूण ५ हजार १४२ गावांची निवड करण्यात आली आहे. या अभियानातून आपल्या राज्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सक्षम व उत्पादनक्षम बनविण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कसे करणार नियोजन?

गाव हे केंद्र घटक मानून कृषी व्यवसाय आणि शेतकर्‍यांची क्षमता बांधणीकरिता लोकसहभागातून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि शेतकर्‍यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर देण्यात येणार आहे. शेतीक्षेत्रात महिला शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यासाठी लक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्प गावात कृषिताईचे सातबार्‍यावर नामनिर्देशन करण्याकरिता कोणतेही पैसे न घेता अर्ज केल्यापासून १५ दिवसांच्या आत उतार्‍यावर नाव लावण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प समितीमध्ये ग्रामपंचायत कायद्यानुसार सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याबरोबरच महिला ५० टक्के प्रतिनिधीत्व करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

किती मिळणार अनुदान?

प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठीच्या योजनांकरिता २ हेक्टर पर्यंत जमीन धारकांना ७५ टक्के आणि २.५ हेक्टर पर्यंत शेतकर्‍यांना ६५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. महिलांना पिकांवरील किडी रोगाची ओळख व नियंत्रण करण्यासाठी शेतीशाळा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शेतकर्‍यांना शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी, जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी अणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे

Exit mobile version