केळीला विक्रमी दर, पुढील महिन्यात राहिल अशी परिस्थिती

banana

नांदेड : मुसळधार व संततधार पावसामुळे खरीपाचे भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. या संकटकाळात दिलासादायक बाब म्हणजे केळी उत्पादकांना तब्बल दोन वर्षांनंतर थोडासा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात प्रथमच केळीला (Banana) विक्रमी दर मिळाला आहे. उत्तर भारतात केळीची मागणी वाढल्यानंतर प्रति क्विंटल २ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान श्रावण महिन्यात दरात अजून वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना काळापासून केळी उत्पादकांमागे संकटांचे शुक्‍लकाष्ठ लागले आहे. गत दोन वर्षांपासून शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. कोरोनाबरोबर केळींच्या बागांवर करप्याचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे उत्पादनात घट आणि दरही कवडीमोल अशा दुहेरी संकटात केळी उत्पादक होते. त्यात भरीस भर म्हणून आता जुलै महिन्यात होत असलेल्या अती पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम संकटात आला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या संकटकाळात केवळ केळी उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. यंदा केळीचा हंगाम हा मे महिन्यापासून सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच केळीला १ हजार ६०० ते १ हजार ७०० रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. त्यामुळे दरात वाढ होणार याबाबत शेतकरी हे आशादायी होते. शिवाय व्यापार्‍यांकडून मागणी ही वाढ होती. जूनमध्ये १ हजार ८०० ते २ हजार असा भाव मिळाला तर जुलैमध्ये आता हाच भाव थेट २ हजार ते २ हजार ५०० पर्यंत येऊन ठेपला आहे. केळीचे घटलेले उत्पादन व वाढलेली मागणीमुळे या भागातील केळीला २ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. मागणीत वाढ कायम राहिली तर दरात आणखी वाढ होणार आहे.

Exit mobile version