जनावरांवरील उपचारासाठी फिरता दवाखाना; जाणून घ्या कशी असेल यंत्रणा

dairy animals

पुणे : वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने जनावरे दगाविण्याचे प्रमाण जास्त असते. या अनेक कारणे असली तरी प्रमुख कारण म्हणजे, पशूवैद्यकीय रुग्णालये वगळता खेड्या-पाड्यांमध्ये जनावरांवरील उपचारासाठी आवश्यक असलेली यंत्रणा! शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात घेवून जनावरांवर उपचार करण्यासाठी फिरता दवाखाना कार्यान्वीत करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरु होते. याच अनुषंगाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित सहकार्याने ८० मोबाईल व्हॅन चिकित्सालय राज्यात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मोबाईल व्हॅनद्वारे थेट बांधावर जाऊन मोठ्या जनावरांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

राज्यात एकूण ४ हजार ४४८ पशुचिकित्सालये आहेत. मात्र ही सुविधा मंडळ स्तरावरच उपलब्ध असल्याने अनेक खेड्यातील पशुमालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून गावातच जनावरांवर उपचार करण्यासाठी ८० मोबाईल व्हॅन चिकित्सालय पर्याय राज्यात उपलब्ध केल्या जाणार आहेत. प्रस्तावित कॉल सेंटरवर पशूपालकांनी संपर्क साधल्यानंतर ही सुविधा मिळणार आहे. याकरिता केंद्र सरकारकडून निधीचे हस्तांतरण महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे करण्यात आला आहे.

राज्यात उभारल्या जाणार्‍या ८० मोबाईल व्हॅन चिकित्सालयाकरिता प्रत्येकी १६ लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक मोबाईल व्हॅन दिली जाणार आहे. प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रणा या अत्याधुनिक मोबाईल व्हॅनमध्ये असणार आहे. यासाठी वर्षभरात पुणे किंवा नागपूर या ठिकाणी कॉल सेंटर उभारण्यात येणार आहे. संबंधित कॉलसेंटरवर संपर्क साधल्यानंतर पशूपालकाच्या गावात ही मोबाईल व्हॅन पोहचणार आहे. कमी वेळेत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version