जनावरांचे लसीकरण करताना अशी घ्या काळजी, अन्यथा होवू शकते मोठे नुकसान

animal vaccine

नाशिक : शेतकर्‍यांचे सर्वात महत्त्वाचे धन म्हणजे पशुधन. याची काळजी घेणे आवश्यक असते. विशेषत: पावसाळ्या दिवसांमध्ये पशुधानकडे विशेष लक्ष द्यावे लागते. जनावरे आजारी पडू नये यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लसीकरण! शेतकर्‍यांनी त्याच्याकडील सर्व जनावरांचे लसीकरण वेळेवर व शास्त्रशुध्द पध्दतीने करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी खालील बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते.

१) लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने व पशुवैद्यकामार्फतच करून घ्यावे. कारण लसीच्या प्रकारानुसार त्या टोचण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो, काही लस कातडीखाली तर काही लस स्नायूंमध्ये दिल्या जातात.
२) लस जास्त परिणामकारक रहावी आणि रोगप्रतिकारक शक्ती जनावरांमध्ये लवकरात लवकर निर्माण व्हावी या करीता लस देण्याची पद्धत व मात्रा निर्धारीत करण्यात आलेली असते. त्यामुळे पशुपालकांनी खातरजमा करून घ्यावी.
३) लसीकरणापूर्वी एक आठवडा अगोदर जनावरांना जंतनाशक औषध पाजावे. जेणेकरून जनावरांच्या पोटातील जंतू मरतील. तसेच जनावरांच्या अंगावरील गोचीड, पिसवा, गोमाश्या, उवा यांचा नायनाटकरण्याकरीता बाह्यपरजीवी नाशकाची फवारणी पशुवैद्यकाच्यासल्ल्यानुसार करावी.

४) जनावरांना रोजच्या आहारात खनिज पुरवावे जेणेकरून पूर्णप्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत होईल.
५) निरोगी व सुद‍ृढ जनावरांनाच लसीकरणाची मात्रा द्यावी.
६) तीन महिन्यापेक्षा लहान असणार्‍या वासरास लसीकरण करू नये.
७) लसीकरण सकाळी किंवा सायंकाळी ऊन कमी असताना करावे.
८) गाभण जनावरात शेवटच्या काही महिन्यामध्ये लसीकरण करू नये.
९) एकदा बाटली फोडली की त्यामधील पूर्ण लसमात्रा लवकरात लवकर उपयोगात आणावी. शिल्लक राहिलेल्या लसमात्रेचा पुन्हा उपयोग करू नये व योग्यरीत्या ती नष्ट करावी.
१०) कळपातील सर्व निरोगी पशूंचे लसीकरण एकाचवेळी करावे. तसे लसीकरण करीत असताना प्रत्येक जनावरांना वेगळी सुई वापरावी.

लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी
१) बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे. जेणेकरून बैेलाच्या शरीरावर ताण पडणार नाही.
२) जनावरांमध्ये उत्‍तम रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी चांगला खुराक द्यावा.
३) लसीकरणानंतर जनावरांचे अतिथंड किंवा उष्ण तापमानापासून संरक्षण करावे तसेच लांबवर वाहतूक करू नये.
४) लसीकरणानंतर ताप, गाठ अथवा काही अपाय घडू शकतात मात्र ते तत्कालीक व सौम्य स्वरूपाचे असतात.

Exit mobile version