चाऱ्यासाठी ज्वारी ऐवजी शेतकऱ्यांनी निवडला हा पर्याय

नागपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून ज्वारी पेर्‍याचे गणित बिघडत आहे. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नसल्याने ज्वारीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. ज्वारीचा पेरा कमी झाल्याने कडब्याचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांनी उन्हाळी मकाची लागवड केली आहे. मका ही जनावरांसाठी पोषक शिवाय ज्वारीपेक्षा अधिकचा दर यामुळे शेतकर्‍यांनी दुहेरी उद्देश साध्य करीत मका लागवडीवरच भर दिला आहे.

रब्बी हंगामात ज्वारी ऐवजी गहू आणि मका पिकांना शेतकर्‍यांनी पसंती दिली आहे. मका हे चारा पीक असले तरी मक्याचे दर ही दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दोन वर्षात मक्याच्या पेर्‍यात दुपटीने वाढ झाली आहे. उन्हाळी मका काढणीनंतर किंवा वावरात असताना पावसाने नुकसानीचा धोका नसतो. त्यामुळे जनावरांना चारा म्हणूनही याची साठवणूक करता येते.

मका ही हुरड्यात आली की, जनावरांच्या चार्‍यासाठी त्याची विक्री व्यापार्‍याला करता येते. यामुळे वाहतूकीचा खर्च तर बाजूलाच राहतो पण मक्याचेही उत्पन्न मिळते. मक्याची कुटी ही जनावरांसाठी सकस आहार मानला जातो. या कुट्टीमुळे जनावरांच्या दुधदुभत्यामध्ये वाढ होते, शिवाय मका कुटीचा दर इतर पशूखाद्य दरापेक्षा कमी असतो.

Exit mobile version