तुषार सिंचनाचा वापर करतांना या बाबींकडे लक्ष ठेवा

sprinkle irigation

पुणे : बदलते हवामान आणि पावसाच्या लहरी पणामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. पाऊस वेळेवर न येणे तसेच पावसात दिर्घ खंड पडणे किंवा पावसाळा लवकर संपणे, या परिस्थितीत शेतकर्‍यांना पीक जगविण्यासाठी पाणी देण्याची म्हणजेच संरक्षित सिंचनाची गरज पडते. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. यात ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पध्दतींचा वापर केला जातो. तुषार सिंचनाचा वापर करतांना शेतकर्‍यांनी कोणत्या पध्दतीने काळजी घेण्याची आवश्यकता असते? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तुषार संच बसवण्यापूर्वी ही काळजी घ्या:
१) पाण्याच्या साठ्यात काडी कचरा जास्त असल्यास सक्शन पार्डपच्या फुट व्हाल्वला बारीक छिद्राची जाळी गुंडाळावी.
२) तुषार पाईपाची जोडणी करताना एका पाईपचे टोक दुसर्‍या पाईप च्या कपलरमध्ये टाकताना, त्या टोकाला माती किंवा कचरा लागू नये याची काळजी घ्यावी. अन्यथा त्यामुळे कपलरच्या रबरी रिंगाचे नुकसान होते. कपलर मधील रबरी रिंग बदलताना तिची दिशा फार महत्वाची असते. ती उलटी
बसविल्यास जोडामधून पाणी गळत राहते.

तुषार संच बसविल्यानंतर घ्यावयाची काळजी:
१) या पद्धतीत पाणी फवारून दिले जात असल्यामुळे हवेत बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तुषार पद्धत शक्यतो दुपारी चालवू नये.
२) जास्त वेगाने वारा वाहत असल्यास जमिनीवर पाण्याचे समतोल वितरण होत नाही. अशा वेळेस सकाळी किंवा सायंकाळी वारा मंद असताना तुषार संच चालवावा. यासाठी लॅटरल पाईपलाईन मधील व तुषार तोट्यातील अंतरात बदल करून देखील चालवणे शक्य आहे.
३) हंगामाच्या सुरुवातीला किंवा नेहमीच तुषार संच चालू करताना, लॅटरल पार्डपचे बुच काढून ठेवावे व त्यातून काही वेळेसाठी पाणी बाहेर पडू द्यावे. म्हणजे पाईपमधील कचरा किंवा इतर अडथळे निघून जातील आणि नंतर लॅटरल बंद करावे.
४) उन्हाळ्यात विहिरीतील पाण्याची खोली वाढते त्यामुळे तोट्यांची संख्या नेहमीपेक्षा कमी करावी. पंपाचा दाब जेवढ्या तोट्यांना पुरतो म्हणजे किती तोट्या लावल्यानंतर पाण्याचा फवारा व्यवस्थित फेकला जाते तो पाहावा व त्यानुसार तोट्यांची संख्या कमी करावी.

तुषार संचाची घ्यावयाची निगा :
तुषार तोट्यांना कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण लावू नये. तुषार तोटीतील वॉशर डीझेल असल्यास बदलावेत. तुषार तोटीच्या स्प्रिंगचा ताण कमी झाल्यास तुषार तोटीच्या फिरण्याचा वेग कमी होतो. तेव्हा स्प्रिंग थोडी ताणून तिचा ताण वाढवावा किंवा स्प्रिंगच बदलावी. सर्व फिटिंग्जचे बोल्ट व नट घट्ट करावेत. तुषार पाईप, टी बेंड मधील रबर रिंग काढून साफ करावी. घर्षणामुळे रिंग झिजली असल्यास बदलावी अन्यथा तेथून पाण्याची गळती होउ शकते.

Exit mobile version