मुंबई : राज्यात पीक विमा कंपन्यांकडून शेतकर्यांची लूट सुरू आहे. याबद्दल शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी असूनही कंपन्यांना त्याचे काहीच देणंघेणं दिसत नाही. याची बोलकी आकडेवारी म्हणजे, खरीप हंगामातील ३७ लाख २ हजार शेतकर्यांना पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई देय आहे. ही रक्कम १७९२ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, आतापर्यंत यातील केवळ ३ लाख शेतकर्यांना ९६.५३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
शेतकर्यांच्या नुकसानीचे एक हजार ७४ कोटी रुपयांपर्यंतचे दावे पीकविमा कंपन्यांच्या कचाट्यात अडकले आहेत. अद्याप नुकसानीचे पूर्ण सर्वेक्षणच कंपन्यांनी केलेले नाही. सुमारे पाच लाख २१ हजार दाव्यांचे सर्वेक्षण रेंगाळले असून पीकविमा कंपन्या त्यासाठी चालढकल करत आहेत. स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ५१ लाख ३१ हजारपैकी ४६ लाख ९ हजार दाव्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही ५ लाख २१ हजार दाव्यांचे नुकसान सर्वेक्षण बाकी आहे.
राज्यात ३७ लाख २ हजार पीक विमा अर्जांपैकी १७ लाख २५ हजार अर्जांची नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली असून, ती १०७४ कोटी रुपये आहे. १९ लाख ७७ हजार अर्जांची नुकसान भरपाई रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. एकूण १६ जिल्ह्यांनी अधिसूचना निर्गमित केल्या आहेत.