काय सांगता, महाराष्ट्रात या ठिकाणी कापसाला मिळाला १६ हजारांचा भाव

cotton-kapus-market-rate

जळगाव : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. गत वर्षाप्रमाणे यंदाही राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असल्याने काही ठिकाणी कापसाचे नुकसान झाले आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता कापसाची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिकपटीने वाढणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव मिळणार असून, पहिल्याच मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डब्रेक भाव मिळाला आहे.

बोदवड तालुक्यात खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सोळा हजारांचा भाव देण्यात आल्याने कापसाची यंदाची सुरुवात जोरदार झाली. वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजारांचा भाव मिळाला. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्‍वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला. रणगाव येथे श्री जिनिंगमध्ये मुहूर्ताचा भाव यावेळी ११ हजार १५३ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. पहिल्याच दिवशी मुहूर्तावर साधारण एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.

अमेरिकेत प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती असल्याने अमेरिकेतील कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज कॉटन मार्केटमधील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होणारी निर्यात कमी होवून, भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीत चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम, पाकिस्तान अशा देशांनाही भारताकडून निर्यात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढेल व दर देखील चांगला मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version