शेतकर्‍यांनो सावधान; २३ लाखाचे सोयाबीन बियाणे जप्त

soyabean

सांगली : प्रत्येक हंगामात बोगस बियांण्यांच्या संकटाला शेतकर्‍यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा शेतकर्‍यांची फसवणूक होते. कधी पिकचं उगवत नाही तर कधी पिकं उगविल्यानंतर फळधारणा होत नाही. यंदाही खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांना बोगस बियाण्यांची धास्ती आहेच.

अशातच कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत इस्लामपुरात तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांचे बोगस सोयबीन बियाणे जप्त करण्यात आले आहे. गरुड सीड्स या नावाने २५ किलोच्या पिशवीतून हे बियाणे सिलबंद करण्यात येत होते. या प्रकरणी कंपनी मालक प्रणव हसबनीस यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्लामपुरात आढळून आलेल्या बोगस बियाणे बॅगवर गरुड सीड्स असे नाव होते तर सोयाबीन केडीए ७२६ जातीचे बियाणे असा उल्लेख होता. मात्र, गोदामातील साठवलेल्या सोयाबीन बियाणाची तपासणी ही भरारी पथकातील अधिकार्‍यांनी केली. दरम्यान, बियाणे कंपनीचे मालक प्रणव हसबनीस यांच्याकडे ना बिजोत्पादनाचा परवाना होता ना बिजोत्पादनासाठी खरेदी केलेल्या सोयाबीनच्या पावत्या नव्हत्या. त्यामुळे हे बियाणे पेरणीसाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकर्‍यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे.

Exit mobile version