मिरचीतून अडीच महिन्यात ३५ कोटींची उलाढाल; जाणून घ्या कुठे झाला हा विक्रम

mirchi

नंदूरबार : देशातील दुसर्‍या क्रमांकाची मिरची बाजार पेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या हंगामात गत आठवड्यापर्यंत बाजार समितीत विक्रमी दीड लाख क्विंटल मिरची खरेदी झाल्याने बाजारपेठेत तब्बल ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समितीत अजूनही मिरचीची वेगाने आवक सुरु असल्याने हंगाम संपेपर्यंत तीन लाख क्विंटलचा टप्पा गाठला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, विक्रमी आवक होवूनही मिरचीचे दर स्थिर आहेत. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली असली तरी दरांनी उसळी घेतली आहे. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. कापसाप्रमाणे मिरचीचेही असेच काहीसे गणित दिसून येते.

बाजारामध्ये यंदा लाली, व्हीएनआर, जरेल, फाफडा आणि शंकेश्‍वरी या वाणांना मोठी मागणी आहे. या सर्व वाणांच्या दरात ५०० रुपयांची घसघशीत वाढ झाल्याने आता प्रति क्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे दिसून आले. हंगाम तेजीत असल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असून मिरची घेऊन आलेल्या वाहनाच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत.

Exit mobile version