सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दुहेरी मार; वाचा काय आहे परिस्थिती

soyabean

लातूर : यंदा पेरणी झाल्यापासून संपूर्ण खरिप हंगाम पाण्याखाली आला आहे. लातूरमध्ये अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक सोयाबीन पाण्याखाली आले असतांना दुसरीकडे सोयाबीनचे दरही घटत आहेत. सध्यस्थितीत बाजारपेठेत सोयाबीनला केवळ ६ हजार २०० असा दर मिळत आहे. यामुळे शेतकर्‍यांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतरही गेल्या ३ दिवसांपासून पिके ही पाण्यातच आहेत. पेरणी क्षेत्रातून पाण्याचा निचराच झालेला नाही. पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान होत आहे. दुसरीकहे ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. गत हंगामात सोयाबीनला विक्रमी दर मिळाल्याने यंदा अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र पेरणी होताच पिके पाण्यात असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे तर दुसरीकडे सोयाबीन या मुख्य पिकाच्याच दरात घसरण सुरु आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर वाढ असतात पण यंदाचे चित्र हे वेगळे आहे. ७ हजार ३०० रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट आता ६ हजार २०० वर येऊन ठेपले आहे.

सोयाबीनच्या दरात घसरण होत असली तरी हरभरा दराने मात्र शेतकर्‍यांना दिलासा मिळत आहे. राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु असताना खुल्या बाजारपेठेत ४ हजार ३०० रुपये क्विंटल असा दर होता. आता राज्यभरातील खरेदी केंद्र असतानाही हरभर्‍याचे दर हे ४ हजार ६०० येऊन ठेपले आहेत. यामुळे हरभर्‍याने शेतकर्‍यांना तारले आहे.

Exit mobile version