लोडशेडिंगला कंटाळून दोन एकरावरील कांद्यावर फिरवला नांगर; केळीही संकटात

A farmer from Yeola taluka turned the plow on onion

नाशिक/जळगाव : ऐन उन्हाळ्यात लोडशेडिंगचा मुद्दा चांगलाच तापला आहे. लोडशेडिंगमुळे सर्वसामान्यांचे हाल होतांना सर्वांना दिसत आहेत. मात्र या लोडशेडिंगमुळे शेतकरी उद्ध्वस्त व्हायला निघाला आहे. अघोषित भारनियमनामुळे व अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांना ऐन हंगामात पिकांना पाणी देता येत नसल्याची उभी पिकं जळू लागली आहे. येवला तालुक्यातील मातुलठाण शिवारात वीजपुरवठ्याअभावी कांद्याला पाणीच देणे शक्य होत नसल्याने शिवाय वाढत्या उन्हामुळे कांदा पिकांचे होत असलेले नुकसान बघवत नसल्याने श्रीराम आव्हाड नावाच्या शेतकर्‍याने थेट २ एकरावरील कांद्यावर नांगर फिरवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारनियमनाचे भूत सर्वसामान्यांच्या डोक्यावर बसले आहे. परिणामी कृषीपंपाला विद्युत पुरवठाच सुरळीत होत नाही. विहिरीला पाणी असूनही त्याचा पिकांसाठी उपयोग होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. असाच काहीसा प्रकार श्रीराम आव्हाड यांच्या बाबतीत घडला. कांद्याचे पीक पदरी पडण्यापूर्वीच आव्हाड यांना २ एकरामध्ये १ लाख ३५ हजार रुपये खर्च आला होता. पण नियमित पाणीच मिळाले नसल्याने कांदा पोसला गेला नाही. त्यामुळे काढणी, छाटणी यावर खर्च करण्यापेक्षा कांदा पिकाचीच मोडणी करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट आपल्या दोन एकर कांदा पिकावर नांगर फिरवला.

केळी बागाही संकटात
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळी बागांसाठी सर्वकाही पोषक असताना आता अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने केळी बागा जोपासणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे. अघोषित भारनियमनामुळे मुबलक प्रमाणात पाणी असतानाही शेतकरी केळी बागांना पाणी देऊ शकत नाही ही वस्तूस्थिती आहे.

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा असतो. यंदा किमान १० तास विद्युत पुरवठा केला जाणार असल्याचे आश्‍वासन महावितरणच्या माध्यमातून देण्यात आले होते. पण आता पिके बहरात असतानाच विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. अपुर्‍या विजेमुळे शेतीसाठी केवळ ४ तास विद्युत पुरवठा केला जात आहे. यातही सातत्य नसल्यामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत. महावितरणच्या भारनियमिनाच्या शॉकमुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांचे लाखों रुपयांचे नुकसान होईल असा अंदाज आहे.

Exit mobile version