ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी या जिल्ह्यात झाले आंदोलन

farmer andolan

कोल्हापूर: यावर्षी सुरुवातीला पावसाने आणि नंतर परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. चांगले उगवून आलेले पीक अतिवृष्टीमुळे हातचे निघून गेले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक जिल्ह्यात ओला दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोेल्हापूर जिल्ह्यातही शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

त्यांना आणि ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये विनाअट द्यावेत, शेतमजुरांना २५ हजार रुपयांचे नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांच्या घोषणा करीत आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली नाका येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शेतकरी अडचणीत आला असताना शासन मदत करत नसल्याबद्दल टीका केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते. तहसीलदारांनी आंदोलन स्थळी भेट देऊन याबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Exit mobile version