कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना दिले जातात हे कृषी पुरस्कार

krushi award

पुणे : दरवर्षी राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारांबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी जे शेतकरी यास पात्र आहेत. त्यांनी शासनातर्फे देण्यात येणार्‍या पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज दाखल करावा.

१) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार :
सन २००० पासून राज्यातील कृषीक्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्ति किंवा संस्थेस डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा राज्याच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी निवड होणार्या व्यक्ति/गट/संस्थेस रु.७५,०००/- रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

२) वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार :
सन १९८४ सालापासून कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय आणि सहकार व ग्रामिण विकास या क्षेत्रात अतिउत्कृष्ट काम करणार्‍या व्यक्ती/संस्थेस वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. सध्या या पुरस्कारांची संख्या १० आहे. प्रत्येक पुरस्कारार्थीला रु. ५०,०००/- रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्निक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

३) जिजामाता कृषीभूषण पुरस्कार :
शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिला शेतकर्‍यांना सन १९९५ पासून जिजामाता कृषीभुषण पुरस्कार देण्यात येतो. राज्यातून दरवर्षी पाच (५) महिला शेतकर्‍यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख आणि स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

४) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार :
पत्रकारीतेद्वारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषी क्षेत्रात विस्तार आणि मार्गदर्शनाबाबत बहुमोल कामगिरी करणारे शेतकरी /व्यक्ती/संस्था त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणार्‍या व्यक्ती तसेच खेड्यांमधुन परसबाग वृध्दींगत करणार्‍या महिला इत्यादींना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन १९९४ पासून वसंतराव नाईक शेतीमित्र हा बहुमान प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. रु. ३०,०००/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

५) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार :
शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवनवीन पध्दतीने पीक लागवड, इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे, शासन/सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर इत्यादी निकषाअंतर्गत शेतकर्‍यांचे एकंदरीत कार्य विचारात घेऊन राज्य शासनाच्या कृषी
विभागाकडून सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकर्‍यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रु.११,०००/- रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे

Exit mobile version