खरिप हंगाम पाण्यात; पीकविमा योजनेबाबत कृषी विभागाचे असे आहे आवाहन

farmer

बुलडाणा : अति पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना पीकविमा योजनेचा आधार वाटू लागला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन देण्यात आली असून त्यापूर्वीच शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आता कृषी विभागाकडून केले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांनीही पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करुन घेणे आवश्यक आहे.

पीकविमा योजना ही केंद्राच्या माध्यमातून राबवली जाते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी शेतकर्‍यांना दोन टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे तर उर्वरित हप्ता शासनाकडून भरला जाणार आहे. नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत यंदा खरिपातील ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आणि कापसाचा समावेश करण्यात आला आहे.

गतवर्षी उडीद आणि मूगाचा समावेश असतानाही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे ३१ जुलैपूर्वीच शेतकर्‍यांनी योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. पीकविमा योजनेत यंदा सोयाबीन पिकालाच अधिकचा परतावा आहे. शिवाय खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रातच वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पिकाचाच विमा अदा करण्यावर शेतकर्‍यांचा भर आहे.

Exit mobile version