शेतकर्‍यांनो बियाणे व खत खरेदी करताना अशी घ्या काळजी, वाचा काय आहे कृषी विभागाचे आवाहन

urea-fertilizer

जळगाव : बनावट बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होण्याचे प्रकार प्रत्येक हंगामात घडत असतात. कधी पेरलेलं उगवत नाही तर कधी फळधारणाच होत नाही. याचं कारण म्हणजे, शेतकर्‍यांना विशिष्ट वाण हवा असतो मात्र ते बाजारात उपलब्ध नसल्याने त्याची चोरण्या मार्गाने खरेदी-विक्री केली जाते. अशावेळेत शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. आता खरिप हंगामाच्या पूर्व तयारीला वेग आला आहे. अशावेळी शेतकर्‍यांनी बियाणे व खते खरेदी करतांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करतांना शेतकर्‍यांनी फसवणूक टाळण्यासाठी पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. यामुळे शेतकर्‍यांनी कृषी केंद्र चालक जे देतील ते घाईगडबडीन न घेता त्याची पूर्ण खातरजमा करुन घ्यावी.

खरीप हंगामात बनावट बियाणे अथवा औषधे, खते ही ज्यादा दराने विक्री करणार्‍यांवर तालुका स्तरावर भरारी पथकांची नेमणूक केलेली असते. अडचण किंवा ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकर्‍यांनी या पथकाशी संपर्क साधणे तेवढेच गरजेचे आहे. शिवाय शेतकर्‍यांची फसवणूक झाली तर कृषी विभागातील अधिकार्‍यांना पक्क्या पावतीचा आधार घेता येतो. त्याशिवाय कारवाई करण्यासही अडचणी निर्माण होतात. शेतकर्‍यांनी वेळीच काळजी घेतली तर कारवाईतून भरपाई मिळण्यास मदत होते मात्र रितसर पावती नसल्यास बियाणांचे पैसे तर नाहीच पण झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण हे देखील ठरविता येत नाही.

Exit mobile version