शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविणार्‍या ‘विदर्भ पॅटर्न’चे कौतूक; जाणून घ्या सविस्तर

sheti-mashagat-cultivation

नागपूर : खरीप हंगामात पेरणी योग्य पाऊस झाला की वेळेत चाढ्यावर मूठ ठेवणे गरजेचे असते. शेतकर्‍यांकडून बी-बियाणांची मागणी होताच बाजारपेठेत कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. त्यामुळे अधिकच्या दराने खताची खरेदी तर करावी लागते शिवाय ते वेळेत मिळत नसल्याने संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन यंदा नागपूर विभागात तब्बल ६० भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे भरारी पथक राहणार असून मंडळाच्या ठिकाणी असणार्‍या कृषी सेवा केंद्रावरही या भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे. शिवाय शेतकर्‍यांना अडचण आल्यास केवळ एका तक्रारीवर प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात २३ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रपळावर खरिपाचा पेरा होणार आहे. मॅान्सूनची चाहूल लागल्यानंतर शेतकर्‍यांची बियाणं आणि खतं खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. नागपूर विभागात बियाणांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला तरी खताबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे अवैध विक्री होऊ नये म्हणून तालुकानिहाय भरारी पथक नेमण्यात आले आहे. अनियमितता आढळून आल्यास निलंबनाच्या कारावाईपर्यंतचे अधिकार पथकातील अधिकार्‍यांना राहणार आहेत.

विदर्भात ११ ते ११ जूनपर्यंत मॅान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुरेसा पाऊस झाला की पेरणीही सुरु होणार आहे. खरिपात शेतकर्‍यांची फसवणुक होऊ नये म्हणून कृषी विभागाचं मिशन खरिप सुरु झालंय. यंदा पोषक वातावरणाचा परिणाम उत्पादनावर व्हावा असा आशावाद शेतकर्‍यांना आहे. शेतकर्‍यांची कुठे अडवणूक किंवा फसवणूक केली जात असल्यास शेतकर्‍यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अक्षीक्षक कार्यालयात तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागपूर विभागाचे कृषी उपसंचालक रविंद्र भोसले यांनी केले आहे.

Exit mobile version