देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; इतक्या कोटींची आहे बक्षिसे

Bullock cart race

पुणे : बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांपैकी एक मानली जाते. जेव्हा सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले गेले. त्याची मोठी चर्चाही झाली. मात्र आता देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीची तयारी सुरु झाली आहे. यात लाखों रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे भरणार्‍या या शर्यतीत महाराष्ट्रासह परराज्यातील शेतकर्‍यांनीही नोंदणी केली आहे.

टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. दि. २८ मे ते ३१ मे २०२२ सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत ही शर्यत पार पडणार आहे. बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन बंधनकार करण्यात आले आहे. या टोकनमधून ’लकी ड्रॉ’ काढून शर्यतीचे नियोजन करण्यात येणार आहे. एका बॉक्समध्ये २ हजार नावांच्या चिठ्ठया असतील. त्यात ज्याची पहिली चिठ्ठी येईल तो बैलगाडा पहिल्यांदा धावणार, असे नियोजन केले आहे.

या शैर्यतीत साधारण २ हजार बैलगाडा धावणार असून यापैकी पहिल्या १२० गाडा मालकांना दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्ये धावणार्‍या बैलगाडा मालकांना जेसीबी, बुलेरो, ट्रॅक्टर आणि रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू याठिकाणाहून बैलगाडा मालकांनी टोकन बुक केले आहे तर महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, जालना, नाशिक, सिन्नर यासह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी या शर्यतीसाठी नोंदणी केली आहे.

स्वतंत्र बैलगाडा पार्किंग व्यवस्था, टू-व्हीलर व फोर व्हीलरसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे. चार दिवस जेवण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रत्येक गाडामालक आणि बैलगाडी मालकाला टी-शर्ट आणि टोपी देण्यात येणार आहे. सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी एल.ई.डी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Exit mobile version