फोटोसेशन नव्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस केले शेतात काम

eknath shinde

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतात काम करतांना अनेकवेळा पाहण्यात आले आहे. एकनाथ शिंदे केवळ फोटो काढण्यासाठी शेतात जात नाहीत तर त्यांना शेतीची प्रचंड आवड आहे. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सभागृहात भाषण करताना शिंदे यांनी बंड फसले असते तर गावाकडे जाऊन शेती केली असते म्हटले होते. आता पुन्हा एकदा सक्रिय राजकारणापासून दोन दिवसांची सुट्टी घेत एकनाथ शिंदे शेतामध्ये रमले. मुख्यमंत्र्यांची शेतात काम करतांनाची अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. नुकताच त्यांनी मुळ गावी दोन दिवसांचा दौरा केला. या दोन दिवस पूर्व वेळ मुख्यमंत्री शेतात राबले. सकाळी शेताच्या बांधा-बांधावरुन जात शेतामध्ये अनेक भाज्यावर्गीय पिकांची लागवड केली. अनेक ठिकाणी नांगरट केली. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी पिकांची लागवड करत गवती चहा, हळद आणि चंदनाच्या झाडांची पाहणी केली. हातात कोळपणी मशीन घेऊन त्यांनी हळद पिकांची मशागत केली. यावेळी त्यांच्या शेतामध्ये असलेल्या मत्स्य तळ्यातील माश्यांना त्यांनी खाद्य देखील दिले.

मुख्यमंत्र्यांनी सैंद्रीय शेती केली असून शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद आदि पिके घेतल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या शेतीबरोबर गोशाळाही तयार केले आहे. गोशाळेतील गाईंना रसायनमुक्त चारा दिला जातो.

वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री
शेतीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, मला शेतीची आवड आहे. आमचे आजोबा, वडील शेतकरी आहेत. मी जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा झाडे लावणं, शेतीची मशागत करणं असे अनेक कामं करत असतो. मी माझ्या आजोबांबरोबर, वडिलांसोबत शेतीत काम केलंय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता मुलगा श्रीकांतही त्यात सहभागी होतोय. श्रीकांतने इकडे खूप वेगवेगळ्या पिकांची लागवड केलीय. श्रीकांतने हळद, तसेच अनेक औषधी वनस्पतींची लागवड केलीय. काजू, आंबे, मोसंबी, संत्रा अशी अनेक फळांची लागवड केली आहे, असं शिंदे म्हणाले.

Exit mobile version