किटकनाशकांमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना मिळणार भरपाई

indian currency

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात शेतात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. भाजीपाला आणि धान्यांवरही विषारी किटकनाशकांचा वापर होत असल्याने त्याचा परिणाम खाणार्‍या ग्राहकावर होतो मात्र अनेकांना माहितच नसते की आपण विषाची चव चाखतोय! यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० च्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. यामुळे विषारी किटकनाशकांच्या वापरावर नियंत्रण आणता येणार आहे. यात किटकनाशकामुळे शेतकर्‍याच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याला योग्य नुकसान भरपाई देखील मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकार कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक आणत आहे. या विधेयकानंतर कोणत्या पिकावर कोणते कीटकनाशक वापरायचे आणि कोणते नाही यावर नियंत्रण कसे राहणार हे पाहायचे आहे. ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हे विधेयक शेतकर्‍यांना बनावट आणि अनधिकृत कीटकनाशकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करेल. या विधेयकानुसार, जर कोणी नोंदणीशिवाय भेसळयुक्त कीटकनाशके आणि कीटकनाशकांची विक्री केली तर त्याला दंड होऊ शकतो आणि फौजदारी खटलाही सुरू करता येईल.

शेतकर्‍यांना कीटकनाशकाबाबत सर्व प्रकारची माहिती मिळावी, ज्यामध्ये या विधेयकात त्याचा वापर, त्याच्याशी निगडित धोके इत्यादीबाबत तरतूद करण्यात आली आहे. सेंद्रिय कीटकनाशकांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचेही म्हटले आहे. यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चुकीच्या कीटकनाशकामुळे शेतीचे किंवा एखाद्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याची भरपाई देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कीटकनाशकांच्या जाहिरातींचा प्रकारही निश्चित केला जाईल.

Exit mobile version