फळे व भाजीपाला साठवणुकीसाठी कमी खर्चात अशा पध्दतीने उभारा शीतगृह

cold storage

नाशिक : फळे व भाजीपाला काढणीनंतर होणार्‍या त्यांच्या नासाडीमध्ये त्यांच्या योग्य साठवणुकीचा अभाव हे एक अतिमहत्त्वाचे कारण आहे. फळे व भाजीपाला साठवणुकीसाठी शीतगृहाचा वापर करणे अति फायद्याचे असले तरी ते फार खर्चिक पडते. मात्र अत्यंत कमी खर्चात घरच्या घरी शून्य उर्जा तत्वावर अर्थात विजेचा वापर न करताही शीतगृह उभारता येते. आज आपण अशाच प्रकारचे शीतगृह उभारणीची माहिती जाणून घेणार आहोत.

विजेचा वापर न करता उभारल्या शीतकक्षाची अर्थात कूल चेंबरची उभारण्यासाठी विटा, नदीच्या पात्रातील बारीक वाळू, वाळ्याचे गवत, गोणपाट व सुतळी इ. वस्तूंची आवश्यकता असते. सर्वप्रथम शीतकक्षाच्या तळाची जागा विटांचे एक थर देऊन (७५ मि. मी.) रचलेली असते व यांच्या भिंती विटांचे दोन थर देऊन व दोन विटांमध्ये ७५ मि. मी. एवढी मोकळी जागा सोडून रचाव्यात. भिंतीची उंची १२५ मि. मी. पर्यंत ठेवावी. कूल चेंबरची रुंदी १,१५० मि. मी. आणि लांबी १,६५० मि. मी. पर्यंत ठेवावी.

दोन भिंतींच्या पोकळीत बारीक वाळू भरून घ्यावी. कूल चेंबरचे वरचे झाकण खास किंवा कंतान बांबू फ्रेममध्ये तयार करुन ठेवावे. विटांच्या भिंतीच्या मोकळ्या जागेत भरलेली बारीक रेती पाण्याने ओलावून घ्यावी. ही रेती ओली राहण्यासाठी सकाळी एकदा व सायंकाळी एकदा रेतीवर पाणी टाकावे. दररोज पाणी रबरी नळीच्या साह्याने किंवा ठिबक संच बसवून देता येते. फळे व भाजीपाला काढल्यानंतर लगेच त्यांची साठवण शीतकक्षात केल्यास त्यांची साठवणक्षमता जास्त दिवस वाढविता येते.

Exit mobile version