कापसाचे दर नवा रेकॉर्ड करणार, हे आहे प्रमुख कारण

cotton tree

मुंबई : गतवर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने कापसाला तब्बल १४ हजार रुपये क्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. यामुळे उत्पादनात घट झाल्यानंतरही शेतकर्‍यांचे फारशे आर्थिक नुकसान झाले नाही. गतवर्षाप्रमाणे यंदाही कापसाला विक्रमी भाव मिळण्याची दाट शक्यता आहे. याची झलक जळगाव जिल्ह्यात पहायला मिळाली. येथे कापसाला सुरुवातीलाच तब्बल १६ हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. यंदा शेतकर्‍यांसाठी सर्वात फायदेशिर ठरणारी बाब म्हणजे, जगात सर्वात मोठा कापूस निर्यातदार असलेल्या अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले आहे. यामुळे यंदा कापसाचे दर नवा रेकॉर्ड करेल, अशी दाट शक्यता आहे.

देशात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र हे १२६ लाख हेक्टर असून यंदा १२४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रफळावर कापसाचा पेरा झाला आहे. यंदाच्या हंगामात ३७० लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने व्यक्त केला होता. पण घटत्या क्षेत्राबरोबर कापसाचे उत्पादनही ३४५ लाख गाठींपर्यंतच जाईल असा सुधारित अंदाज आहे. मात्र अजून महाराष्ट्रासह अनेक भागात निसर्गाचा लहरीपणा सुरुच असून त्याचा मोठा फटका खरिप हंगामाला बसत आहे. यात कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असल्याने परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट येण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. घटलेले उत्पादन आणि मागणीत राहणारी वाढ हे भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे.

अमेरिकेत दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अमेरिकेत २५ लाख गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापसाचे उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाच्या मागणीत वाढ होणार आहे. कापसाच्या बाबतीत अमेरिका हा सर्वात मोठा निर्यातदार आहे. मात्र आता त्यांचेच उत्पादन घटल्याने निर्यातीची ही तूट भारत भरुन काढू शकतो. चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम या देशांना भारताकडून निर्यात होणार आहे. यामुळे भारतीय कापसाला सोन्याचा भाव मिळेल, अशी आशा आहे.

Exit mobile version