कशी नशिबाने थट्टा मांडली, आधी पाण्याअभावी आता अती पावसामुळे दुबार पेरणीचे संकट

pik

प्रतीकात्मक फोटो

पुणे : १५ दिवसांपूर्वी पावसाविना खरीप हंगाम हातचा जाणार अशी स्थिती होती तर आता खरिपातील सर्वच पिके ही पावसाने साचलेल्या पाण्यात आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा कायम फटका हा शेतकर्‍यांना बसत आहे. यंदा उशिरा झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी अल्पावधीच खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. शिवाय समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरणामुळे पिकांची उगवणही झाली. मात्र, उगवण होताच राज्यभरात अनेक जिल्ह्यामध्ये कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे शेतांना तळ्याचे स्वरुप येवून सर्वच पिके पाण्याखाली आले आहे. वापसा होत नसल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे.

राज्यभरात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अधिकतर शेतकर्‍यांनी चाढ्यावर मूठ ठेऊन पेरण्या उरकत्या घेतल्या. मात्र, पेरणी होताच सुरु झालेला पाऊस आता ८ दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. पेरणी होताच अधिक पाऊस झाला तर पिकांची वाढ तर खुंटतेच पण पिके ही पिवळी पडायला लागतात. सध्यस्थितीत कांदा, मूग, भुईमूग, कापूस, सोयाबीन, बाजरी ही पिके सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुबारमुळे होणार दुहेरी नुकसान
अधिकच्या पावसामुळे जर दुबार पेरणीचे संकट ओढावले तर मात्र शेतकर्‍यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. यंदा बी-बियाणांसह खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी पुन्हा अधिकच्या किंमतीने बियाणांसाठी खर्च करावा लागणार. शिवाय बाजारपेठेत बियाणे उपलब्ध होणार की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आगोदरच खरिपाच्या पेरण्यांना उशीर झालेला आहे. १५ जुलैपर्यंत पेरण्या झाल्या तर सरासरी एवढे उत्पादन मिळते अशा कृषी विभागाचा अंदाज आहे. दुबार पेरणीसाठी पावसामुळे उशीर झाला तर खर्च करुनही काय उपयोग अशी स्थिती आहे.

३५ नागरिकांसह जनावरेही दगावली
१ जून ते ८ जुलै दरम्यानच्या काळात पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये ३५ नागरिकांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. तर १८ हजार हेक्टर क्षेत्रफळावरील पिके पाण्याखाली आली आहेत. या हंगामात आतापर्यंत ३५ जनावरे ही वेगवेगळ्या कारणाने दगावलेली आहेत. त्यामुळे गरजेचा असलेला पाऊस आता नुकसानीचा ठरत आहे. गेल्या ३ दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातला आहे. नदी, नाले, ओढे तर ओसंडून वाहत आहेतच पण खरिपातील पिकेही पाण्यात आहेत. त्यामुळे खरिपाचे भवितव्य काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलेला आहे.

राज्यभर मुसळधार
राज्यातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासह मुंबई, ठाणे पालघर या भागातही पाऊस पडत आहे.

Exit mobile version