‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबारचे संकट; अन्य शेतकऱ्यांना आहे ‘हा’ सल्ला

sad indian farmer 1

धुळे : किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवास चाढ्यावर मुठ ठेवू नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अनेक शेतकर्‍यांनी पुरेसा पाऊस झालेला नसतांनाही धुळपेरणीचे जोखीम घेतले. धुळे जिल्ह्यात काही भागांवर कडधान्याचा पेरा झाला आहे. मात्र आता ती पिकेही धोक्यात आली आहेत. शेतकर्‍यांवर दुहेरी संकट ओढावल्याने नेमके खरिपाचे चित्र काय राहणार याबाबत साशंका उपस्थित होत आहे.

खरिपाच्या तोंडावर जिल्ह्यात झालेल्या अल्प पावसाच्या जोरावर कडधान्याचा पेरा झाला होता. यामध्ये मुग, उडदाचा समावेश होता. आता पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या क्षेत्रफळावरील बियाणे उगवलेच नाही. ज्या क्षेत्रावर मका, भुईमुग, कांदा या पाण्यावर येणार्‍या पिकांना देखील पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री गारवा अशी परस्थिती सध्या जिल्ह्यात असल्याने खरिपाचे भवितव्य काय असा सवाल उपस्थित झाला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

सध्याच्या उघडीपीमुळे पेरणीसाठी आवश्यक असलेली ओल देखील जमिनीत राहिलेली नाही. त्यामुळे पेरण्या लांबणीवर तर पडल्या आहेतच पण खरिपाचे भवितव्य काय असा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरा झाला होता. मात्र, यंदा जे पेरले तेच उगवले नाही त्यामुळे उत्पादनाचे तर सोडाच पण खरिपाचे काय होणार याची धास्ती शेतकर्‍यांना आहे. यामुळे अजूनही ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केलेली नाही. त्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version