अरे देवा…! महाराष्ट्रात तब्बल ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

untimely-rain

मुंबई : राज्यात पाऊस ओसरला असला तरी गेल्या २० दिवसांमध्ये घातलेल्या थैमानाचे चित्र आता समोर येऊ लागले आहे. यंदा खरिपातील पेरणी होताच अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने तब्बल ९ लाख हेक्टरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. यामुळे यंदा उत्पादनातही मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे. सध्या शेतशिवरात कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनामे सुरु आहेत. मात्र सरकारने केवळ पंचनाम्यांचे सोपास्कार न पार पाडत शेतकर्‍यांना उभे करण्यासाठी ठोस आर्थिक मदत करण्याची अपेक्षा आहे.

पावसामुळे खरिपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस या पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. असे असले तरी नुकसानभरपाईच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहिलेला आहे. यंदा मदतीचे निकष बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २०१५ सालच्या निकषानुसारच शेतकर्‍यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मिळणार आहे. सतत तीन वर्षांपासून शेतकर्‍यांना या-ना त्या प्रकारे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नाही यामुळे मशागतीपासून पेरणी आणि खत-बियाणांचा खर्च पाहता ही मदत तोडकी राहणार आहे.

पंचनामान्यांना सुरुवात मात्र ही आहे अडचण
पावसाने उघडीप देताच कृषी अन् महसूल विभाग कामाला लागला आहे. ३० जुलैपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करायचा आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांचे संयुक्त पथक पंचनामे करीत आहे. परंतु सततच्या पावसाने अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. पावसाने शेतातील पीक आणि सुपीक माती वाहून गेली. पुढील अनेक वर्षे पीक उभे राहणे अवघड आहे. यासाठी मोठ्या मदतीची आवश्यकता आहे.

मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका
पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान हे विदर्भ आणि मराठवाड्यात झाले आहे. शिवाय यंदा सोयाबीनची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली होती. त्यामुळे याच पिकाचेही नुकसान झाल्याचे समोर येत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार पावसामुळे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात झाले आहे. तेथे दोन लाख ९७ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. यात १ हजार हेक्टर वरिल जमी खरडली गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रफळावर नुकसान झाल्याचा आहे. त्या पाठोपाठ वर्धा जिल्ह्यात एक लाख ३१ हजार हेक्टर, नागपुरात २८ हजार हेक्टर, भंडाऱ्यात १९ हजार हेक्टर, हिंगोली १५ हजार ३०० हेक्टर, गडचिरोली १२ हजार हेक्टर, बुलडाणा सात हजार हेक्टर, अकोला ८६४ हेक्टर, नाशिक दोन हजार हेक्टर, पुणे १८०० हेक्टर, नंदूरबार १९१ हेक्टर, रायगड १०५ हेक्टर, गोंदीया ५५ हेक्टर, ठाणे २० हेक्टर, वाशिम १० हेेक्टर, सांगली आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी २ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Exit mobile version