बाजार समित्यांचा कारभार शेतकर्‍यांना समजण्यासाठी राज्य सरकारने घेतला हा निर्णय

bajar-bhav

पुणे : बाजार समित्यांमधील भोंगळ कारभाराचा फटका शेतकर्‍यांना नेहमीच बसत असतो. यापार्श्‍वभूमीवर कोणत्या बाजार समितीचे काम चांगले आहे, याची माहिती शेतकर्‍यांना असणे आवश्यक असते. याकरीता बाजारसमित्यांच्या वर्षभराच्या कामगिरीवर त्याचे मुल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे आता बाजार समित्यांची रँकिंग काढण्यात येईल. यामुळे कोणती बाजार समिती चांगले काम करते व कोणती शेतकर्‍यांना फसवते? याची माहिती शेतकर्‍यांनाही कळेल.

राज्यात प्रथमच अशाप्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी ही जाहीर होणार आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरु केला जात असलेल्या या प्रकल्पातून विविध उपक्रम तर राबवले जाणार आहेतच पण त्याचा फायदा शेतकर्‍यांना कसा होईल यावरही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत बाजार समित्यांचा कारभार कसा आहे हे समोर येणार आहे. त्यामुळे भविष्यात शेतीमाल कोणत्या बाजार समितीमध्ये घालावा, तसेच कोणत्या बाजार समितीचे व्यवहार चोख आहेत हे सुध्दा शेतकर्‍यांना समजणार आहे.

बाजार समितीचे मुल्यांकन नेमके कशावर असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. यासाठी बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. याकरिता ३५ वेगवेगळे निकष ठरवून देण्यात आले आहेत तर २०० पैकी गुण असणार आहेत. सेवा-सुविधासाठीच १४ निकष आणि त्याचे ८० गुण ठरवून देण्यात आले आहेत. अशाप्रकारे सेवा-सुविधा ते मार्केटमधील रेट इथपर्यंत निकष देण्यात आले आहेत. त्यामुळे बाजार समितीची सर्व कार्यप्रणालीच शेतकर्‍यांसमोर राहणार आहे.

बाजार समितीचे मुल्यमापन करीत असताना समितीचे वार्षिक उत्पन्न, बाजार फी, शेतीमालाची आवक आणि वर्षभरात झालेली वाढ, समितीचा अस्थापना खर्च, नियमित भाडे वसुली, गेल्या ५ वर्षातील लेखापरिक्षण, त्यामधील दोष दुरुस्ती, मंडळाविरुध्द झालेल्या कारवाई, खरेदीदाराच्या दप्तराची तपासणी यासारख्या बांबींचा समावेश असणार आहे. त्यामुळे बाजार समिती कशा पध्दतीने काम करते आणि शेतकर्‍यांसाठी ती योग्य कशी याची माहिती मिळणार आहे.

Exit mobile version