लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनची वाढ खुंटली; अशी आहे परिस्थिती

guidance-for-soybean

बुलढाणा : गत १० दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. वापसा होत नसल्याने पाण्याखाली आलेली पिकं सडू लागली आहेत. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसत आहे. सोयाबीनवर लष्करी अळीचाही प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या १० दिवसांपासूनच सुर्यदर्शनच झाले नसल्याने लष्करी अळी वाढण्यासाठी हे पोषक वातावरण आहे.

यंदा जून महिन्यात वरुणराजाची अवकृपाच राहिले त्यामुळे पेरणीचे मुहूर्त सोडाच पण खरिपातील पेरण्या होतील की नाही अशी स्थिती होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अल्पशा पावसाच्या जोरावर शेतकर्‍यांनी चाढ्यावर मूठ ठेवली पण पेरणी होताच सुरु झालेला पाऊस गेल्या १० दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिके ही पिवळी पडत आहेत.

पाऊस व ढगाळ वातावरणात पिकांची वाढ तर खुंटली आहे पण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या तालुक्यातील सोयाबीन हे लष्करी आणि उंट अळीच्या संकटात सापडले आहे. शेतकर्‍यांनी किटकनाशकांची फवारणी केली आहे मात्र, सततच्या पावसामुळे त्याचाही परिणाम या अळीवर होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी अधिकार्‍यांनी पीक पाहणी करुन योग्य तो सल्ला द्यावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

Exit mobile version